आंबोलीतील जाहीर सभेसाठी मतदारांची मोठी गर्दी
मुरुड : प्रतिनिधी
सीमा सुरक्षित राहिल्या तर देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतात. केंद्रातील भाजप सरकार हे देशाच्या सुरक्षेला महत्व देणारे असून, देश रक्षणाला महत्व देणार्या या सरकारच्याच हाती मतदारांनी सत्ता द्यावी व त्यासाठी भाजप, सेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 14)आंबोली येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मंगळवारी संध्याकाळी मुरुड तालुक्यातील आंबोली येथे जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तीत्वात आल्यापासूनच आपला देश सुरक्षित राहण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यात आली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसाला 18 तास काम करून देशाच्या प्रगतीसाठी काम करीत आहेत. रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध देशभक्तीची लढाई आहे. जनतेने सजगपणे मतदान करून महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले. उस्मान रोहेकर यांचेही या वेळी भाषण झाले.
मुरुडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेत संजय कोनकर, तालुका उपाध्यक्ष महेश मानकर, नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती प्रमोद भायदे, गट नेत्या मुग्धा जोशी, शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, जगदीश पाटील, शैलेश काते, गणेश मोंनाक, नरहरी गीदी, मनोज कमाने, अभिजित पानवलकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि आंबोली पंचक्रोशीतील मतदार आंबोली येथे झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्या व्यक्तीवर 72 हजार सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे, अशी माणसे सत्तेत येता काम नये. भ्रष्टचारी लोकांना कदापि निवडून देऊ नका. महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे निष्कलंक असून स्वच्छ चारित्र्याचे आहेत. असा माणूस आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवा.
-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड