रांची : वृत्तसंस्था
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील तिसर्या व अंतिम सामन्यात भारताने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी 3-0 अशी जिंकली. या वेळी टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी एक विशेष खेळाडू सहभागी झाला होता. तो खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी.
रांचीमध्ये कसोटी सामना होत असूनही धोनी कुठे आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. धोनी न दिसल्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि उलटसुलट चर्चांना उधाणही आले होते. अखेर मंगळवारी धोनी चक्क टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अवतरला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या ट्विटर हॅण्डलवर फोटो ट्विट केला. यामध्ये धोनी नवोदित फिरकीपटू शाहबाज नदीम याच्यासोबत संवाद साधताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत नदीमदेखील झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करतो.
बीसीसीआयने हा फोटो ट्विट केल्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. यावर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर धोनीने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यानंतर धोनीच्या क्रिकेट निवृत्तीबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपण निवड समितीसोबत धोनीबाबत बोलणार असल्याचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले होते.
अखेर धोनी समोर आला. तो सध्या मैदानावर नसला तरी त्याने ड्रेसिंग रूममध्ये एण्ट्री केल्याने आगामी काळात तो मैदानावरही दिसण्याची शक्यता आहे.