Breaking News

शक्तिवर्धकाचा दुसरा डोस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आणखी एका भरीव आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसर्‍या आर्थिक पॅकेजनंतर विरोधक मात्र गडबडून गेलेले दिसले. जाहीर झालेल्या या ताज्या आर्थिक सवलती अपुर्‍या कशा आहेत याबद्दल नेहमीप्रमाणे ओरड होईलही, परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार केल्यास नवे आर्थिक पॅकेज शक्तिवर्धकाच्या मात्रेप्रमाणे काम करेल यात शंका नाही. कोरोना विषाणूशी लढता लढता सारे विश्वच अक्षरश: मेटाकुटीला आले आहे. मोठमोठ्या महासत्तांची अर्थव्यवस्था डामाडोल झालेली असताना भारतासारखा विकसनशील देश कसा काय तग धरणार, असा सवाल देशोदेशीचे अर्थतज्ज्ञ उपस्थित करीत होते. तब्बल 137 कोटी इतकी लोकसंख्या असलेला भारतासारखा विशाल खंडप्राय देश कोरोनाने दिलेल्या आर्थिक फटक्यामुळे संपूर्णत: कोलमडेल अशीच सर्वांची अटकळ होती. विशेषत: प्रगत मानल्या जाणार्‍या पाश्चात्य देशांमधूनच अशी शंका काहिशा हेटाळणीच्या सुरात उपस्थित केली गेली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे भविष्यवेधी नेतृत्व भारताला लाभले आहे ही बाब या जागतिक शंकेखोरांच्या लक्षात आली नसावी. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर कठोर लॉकडाऊन देशाच्या जनतेला सहन करावा लागला. बहुतांश व्यापारउदीम आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले. लाखो नागरिकांच्या पोटापाण्याचे व्यवसाय नष्ट झाले. अशा विपरीत परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुमारे 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. देशातील छोट्यामोठ्या उद्योजकांनी आणि पोटासाठी राबणार्‍या मजुरांनी पुन्हा एकदा उठून उभे राहावे आणि जीवनाला भिडावे यासाठी केंद्र सरकारने दिलेला तो मदतीचा हात होता. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने परिस्थिती अधिकच चिघळली. त्याचे चटके देशाला सध्या बसत आहेत. या चटक्यांचा दाह कमी करण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी सोमवारी आणखी एका भरीव आर्थिक पॅकेजची घोषणा केली. ते नवे पॅकेज सर्वंकष विचार केला तर सुमारे 6.28 लाख कोटी रुपयांपर्यंत जाते. एकंदरीत आठ क्षेत्रांसाठी हे पॅकेज साह्यभूत ठरेल. यापैकी एकट्या आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटी रुपयांची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या व संभाव्य तिसर्‍या लाटेला तोंड देताना भारतीय जनतेला या आर्थिक साह्याचा मोठा आधार लाभेल यात शंका नाही. याशिवाय सुमारे एक लाख दहा हजार कोटी रुपयांइतकी कर्ज हमी योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. छोट्या उद्योजकांना त्याचा उपयोग होईल. कोरोनाने कुरतडलेल्या गेल्या दीड वर्षामध्ये पर्यटन व्यवसायाचे अपरिमित नुकसान झाले. आजही हा व्यवसाय सावरू शकलेला नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुमारे 20 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज पर्यटन व्यावसायिकांसाठी घोषित केले आहे. तसेच भारतात पर्यटनासाठी येणार्‍या पहिल्या पाच लाख परदेशी प्रवाशांना व्हिसा शुल्क माफ करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. त्याचप्रमाणे देशातील शेकडो पर्यटन स्थळांमध्ये आपली रोजीरोटी कमावणार्‍या टूरिस्ट गाइड्सनादेखील सरकारने मदतीचा हात देऊ केला आहे. नोंदणीकृत टूरिस्ट कंपन्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रतिबंधक लसीचे दोन डोस आवश्यक असतात, त्याप्रमाणेच भारतीय अर्थव्यवस्थेला लाभलेला शक्तिवर्धकाचा हा दुसरा बुस्टर डोस आहे, असेच म्हणावे लागेल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply