खोपोली : बातमीदार
सध्या राजकिय आरोप प्रत्यारोपात कडकनाथ कोंबडा-कोंबडी हा विषय गाजत असून, ढाब्यावर काळ्या रंगाच्या कडकनाथची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बॉयलरच्या पाचपट आणि गावरान कोंबडी हंडीच्या सहापट कडकनाथ हंडीला मुंबईच्या ग्राहकांकडून मागणी असल्याचे खालापुरातील धाबा चालक सांगत आहेत.
रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी कडकनाथ कोंबडीचे पालन होत असले, तरी नगर जिल्ह्यातून येणार्या कडकनाथला ढाबा चालक पसंती देत आहेत. पिसापासून पायापर्यंत आणि तुर्यापासून चोचीपर्यंत संपूर्ण काळा रंग असलेला कडकनाथ कोंबडा, कोंबडी सध्या ढाब्यावरची फेवरेट डिश बनली आहे. औषधी गुणधर्म असलेले मांस यामुळे कडकनाथ महाग असूनदेखील खवय्ये खाण्याचे चोचले पुरविताना आणि आरोग्याची काळजी घेतल्याचे समाधान मिळवित आहेत. रक्त, मांस संपूर्णतः काळे आणि शिजायला जवळपास एक तास लागणार्या कडकनाथ कोंबडीची हंडी सुमारे 1560 रुपयाला आणि कोंबडा असेल, तर 2000 रुपये हंडीला मोजावे लागतात. कुकरच्या जवळपास 40 शिट्या दिल्यानंतरच कडकनाथ खाण्यालायक नरम होत असल्याचे ढाबा चालक सुर्वे सांगतात.
कडकनाथचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणताही रोग होत नाही, बॉयलरप्रमाणे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. कडकनाथला खाण्यासाठी विशेष काही लागत नाही, उलट त्यांना गावरान कोंबड्यांप्रमाणे उघड्यावर मोकळे सोडावे लागते.
कडकनाथची वाढती मागणी पाहून काही जण फसवणूकसुद्धा करू लागले आहेत. ते कडकनाथसारखे दिसणारे कोंबडा, कोंबडी दाखवितात, मात्र कापल्यानंतर काळ्या ऐवजी पाढंरे मांस असल्याचे समजते, असे सुर्वे सांगतात. सध्या महामार्गावरील धाब्यांवर कडकनाथ हंडीचे फलक पाहून खवय्ये हमखास थांबू लागले असून, त्यामुळे रायगडमध्ये कडकनाथचा भाव वधारला आहे.