आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात
नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार
एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे.
सद्यस्थितीत सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या दिवाळे, बेलापूर व सारसोळे गाव येथील एकूण 82 मच्छीमार बांधवांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक लाख 92 हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात आली आहे. प्रत्येक मच्छीमाराला मोठ्या होडीसाठी 6.50 लाख रुपये व लहान होडीसाठी 3.50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे नुकसानभरपाई मिळाल्याने माघी गणेश जयंतीच्या दिवशी जणू काही गणपती बाप्पा पावला असल्याची प्रतिक्रिया अनेक मच्छीमार बांधवांनी व्यक्त करून आनंदोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे त्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सत्कार केला.
नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे तसेच वाशी गाव येथील कोळी बांधव मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सेतूच्या उभारणीमुळे या परिसरात मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. मच्छिमार कोळी बांधवांना संकटातून बाहेर काढणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे.
-मंदाताई म्हात्रे, आमदार, बेलापूर