काँग्रेस आमदाराविरोधात शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पुणे ः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून वेगळे होत भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर आरोप करीत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
‘राज्यमंत्रिपदाच्या काळात मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. प्रकल्पाच्या बंद जलवाहिनीच्या कामालाही सुरुवात केली, मात्र या कामात काँग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांनी सातत्याने अडथळे आणले. अधिकार्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आता या कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे, असा त्यांचा आग्रह आहे. वास्तविक या प्रकल्पाचे काम बंद व्हावे यासाठी नेहमीच प्रयत्न करणार्या व्यक्तीच्या हातून जर प्रकल्पाचा शुभारंभ झाला, तर त्यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही,’ अशा शब्दांत शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.