Breaking News

वसुलीसाठी आता विवेक पाटलांच्या बेनामी मालमत्तांचा शोध आवश्यक

मालमत्तांवर घेतलेल्या बँक कर्जांमुळे लिलाव कठीण

पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करायच्या असतील तर बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या बेनामी मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव करावा लागणार आहे. त्यामुळे आता पोलीस आणि सहकार खात्याची कसोटी लागणार आहे. गोरगरीब खातेदार आणि ठेवादारांना त्यांचे पैसे परत करण्याचा हा एकमेव तातडीचा मार्ग आहे.
‘कर्नाळा बँकेतील ठेवीदारांसाठी वेळ पडल्यास मी माझी मालमत्ताही विकण्यास तयार आहे’, अशा गमजा मारणारे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी आपल्या जवळपास सर्वच मालमत्तांवर आणि वाहनांवर इतर बँकांकडून कर्ज घेतलेले असल्याने या मालमत्ता जप्त करून विकायच्या कशा, असा प्रश्न राज्याच्या पोलीस आणि सहकार खात्यासमोर उभा राहिला आहे. या ज्ञात (सर्वांना माहीत असलेल्या) प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे विवेक पाटील यांनी घेऊन ठेवलेल्या बेनामी प्रॉपर्टीजचा शोध घेण्यासाठी कर्नाळा बँकेतील विवेक पाटील यांच्या मर्जीतील कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक आणि जवळच्या स्नेहीजनांचीही चौकशी करून पाटील यांच्या बेनामी प्रॉपर्टीज शोधणे गरजेचे असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
सहकार खात्याने या घोटाळ्याची विशेष लेखापरीक्षकामार्फत चौकशी सुरू केली होती. या चौकशीत प्रत्येक संचालकाने दिलेल्या जबाबासोबत विवेक पाटील यांचाही जबाब जोडला आहे. या जबाबात विवेक पाटील यांनी ‘या सर्व व्यवहाराला संबंधित संचालक जबाबदार नसून मी जबाबदार आहे. माझी मालमत्ता विकून ही देणी देण्यात येतील’, असे म्हटले आहे.
विवेक पाटील यांनी प्रत्येक संचालकांची हमी घेऊन दिलेला हा जबाब पाहता त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यास आणि त्यांचा लिलाव करून कर्नाळा बँकेचे खातेदार आणि ठेवीदार यांची देणी देण्यास ते तयार असल्याचे सकृतदर्शनी दिसत होते, मात्र प्रत्यक्षात विवेक पाटील यांनी त्यांच्या या सर्व ज्ञात मालमत्तांवर वेगवेगळ्या बँकांची कर्जे घेतली आहेत. त्यामुळे या मालमत्ता लिलावात काढणे सध्या कठीण आहे.
अशा परिस्थितीत या मालमत्तांवर चढलेला इतर बँकांचा (कर्जाचा) बोजा असल्याने या मालमत्तांचा लिलाव करण्यापूर्वी सहकार खात्याची विशेष परवानगी घेण्याचे सोपस्कार करावे लागतील. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची आहे. मालमत्तांवरील बँकांची कर्जे आणि खातेदार व ठेवीदारांची परतफेडीची रक्कम यांचाही हिशेब लक्षात घेता कर्नाळा बँकेच्या ग्राहकांसाठी बँकेकडून होऊ घातलेल्या परतफेडीची शक्यता सध्या कठीण आहे.
एका बाजूला बेनामी मालमत्ता शोधून काढणे आणि त्याचबरोबर लवकरात लवकर बँकेचा परवाना रद्द करून बँक अवसायनात काढणे हा मार्ग आहे तसेच ‘डीआयसीजी’कडे कर्नाळा बँकेने ठेवींच्या विम्यापोटी भरलेला भरलेला प्रीमियम 38 लाख 82 हजार रुपयांच्या बदल्यात 48 हजार ठेवीदारांना त्यांनी ठेवलेल्या ठेवीपोटी प्रत्येकी फक्त पाच लाख रुपये परत मिळतील.
याव्यतिरिक्त उर्वरित दोन हजार 458 ठेवीदारांच्या 270 कोटी 72 लाख रुपयांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण नाही. त्यामुळे या ठेवादारांनाही त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी विवेक पाटील यांच्या बेनामी प्रॉपर्टीज हुडकून काढणे आणि त्यांचा लिलाव करणे गरजेचे आहे.
पावसाळी अधिवेशनात घोटाळा गाजणार
विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. या अधिवेशनात कर्नाळा बँकेचे हे प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी करणार आहेत तसेच ही बँक अवसायनात आणण्यासाठी ते सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा करीत आहेत. याशिवाय विधानसभा अधिवेशनातही आपल्या सहकारी आमदारांसह मागणी मान्य करण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply