Breaking News

कोकण विकासाचा केंद्रबिंदू ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; खारघरमध्ये विराट सभा, विजयाचा संकल्प

पनवेल ः प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात भाजप महायुतीने आपली जबाबदारी पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न केला. यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला भरभरून साथ दिली. यावरून सरकारची वाटचाल योग्य दिशेने आणि अपेक्षित वेगाने सुरू आहे हे स्पष्ट होते. भारताच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहिले आहे. नवीन भारताच्या निर्मितीतही महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्याचा केंद्रबिंदू कोकण असेल, असा विश्वास नवभारताचे विकासपुरुष आणि स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 16) खारघर येथे व्यक्त केला.
भाजप, शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती, राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे पालकमंत्री व डोंबिवलीचे उमेदवार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री व पेणचे उमेदवार रविशेठ पाटील, माजी मंत्री व ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट महाजनादेश संकल्प सभा खारघर सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्कजवळील भव्य मैदानात झाली. त्या वेळी ते बोलत होते.
सभेच्या व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री सतीश धोंड, आमदार निरंजन डावखरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील आधीच्या काँगे्रस आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. 2014पूर्वी मुंबई आणि परिसरात रिअल इस्टेट क्षेत्रात अंडरवर्ल्ड आणि बिल्डर माफियांचे संबंध होते. अनेक गोष्टी त्या वेळी घडल्या. त्याचे पडलेले डाग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आजवर धुवून काढता आले नाहीत, तर शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणार्‍या आणि गरिबांच्या घराची स्वप्ने उद्ध्वस्त करणार्‍या भूमाफियांना संपवण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षांत झाला. पूर्वी नेत्यांच्या संगनमतातून बिल्डर माफियांची मनमर्जी चालायची. रिअल इस्टेट हे क्षेत्र भ्रष्टाचाराचा पैसा खपवण्याचे माध्यम बनले होते, अशा शब्दांत मोदींनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. जो बिल्डर शेतकर्‍यांसोबत प्रामाणिकपणे काम करेल, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, पनवेल, रायगड, ठाण्यासह कोकणात आम्ही सागरमाला योजना आणली. जेट्ट्या व टर्मिनल उभारले. पनवेल परिसरात विविध योजना, प्रकल्प साकारले जात आहेत. नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच येथून विमानांचे उड्डाण होईल. सी लिंक प्रकल्पही आकार घेत आहे. तेथून गाड्या धावतील, तसेच मेट्रोसुद्धा लवकरच धावेल आणि या सर्वांतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी या परिसरात तब्बल दोन लाख पक्की घरे उपलब्ध होणार असल्याचे सांगून हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. त्यासाठी सर्वतोपरी ताकद देणार असल्याचे आवर्जून नमूद केले.
नरेंद्र आणि देवेंद्र जेव्हा एकसाथ येतात तेव्हा एक अधिक एक दोन होत नाहीत, तर एकावर एक 11 होतात. याच सूत्रानुसार महाराष्ट्राला डबल इंजीन लागल्याने राज्याच्या विकासाची गाडी 11 पट शक्तीने वेगात धावत आहे. यामुळे 21 ऑक्टोबरला मतदान करताना या डबल शक्तीचा विचार लक्षात ठेवा, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.
सभेला कार्यकर्त्यांची अफाट गर्दी पाहून मला तुमचा उत्साह दिसतोय तो अभूतपूर्व आहे. एवढी मोठी सभा दुपारी होत नसते, परंतु ही सभा कॉस्मोपॉलिटन परिसरात रणरणत्या उन्हातही उत्सवाप्रमाणे आणि भव्यदिव्य असल्याचे सांगून पंतप्रधानांनी आयोजकांचे कौतुक केले.

दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र!
दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ही जोडी सुपरहिट झाली आहे. नरेंद्रला तुम्ही दिल्लीत पुन्हा सत्तेत विराजमान केले. तशाच प्रकारे देवेंद्र यांनाही पुन्हा महाराष्ट्राची सत्ता द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी आपल्या भाषणात केले.

पंतप्रधानांकडून मराठीत संवाद
भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परशुरामाच्या या पवित्र कोकणभूमीत अभूतपूर्व उत्साह दिसतोय, असे मराठी भाषेतून सांगून उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात पुन्हा यायचे म्हणजे प्रेरणा घेण्यासारखे दुसरे भाग्य नाही, असेही ते म्हणाले.

पुन्हा आणू या आपले सरकार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विकासाच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. खारघरच्या आधी दोन सभा करूनही त्यांचा उत्साह कायम होता. उपस्थितांशी त्यांनी उत्स्फूर्त संवाद साधला. सरतेशेवटी ‘पुन्हा आणू या आपले सरकार’ ही घोषणा त्यांनी सर्वांच्या सहभागाने दिली. या वेळी प्रचंड जोश दिसून आला.

पाकचा खात्मा करण्याची हिंमत फक्त
नरेंद्र मोदींमध्येच : रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानचा खात्मा करण्याची हिंमत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात असल्याचे सांगून आता राहुल गांधी पंतप्रधान बनणे शक्य नसल्याचे म्हटले. या वेळी त्यांनी ‘पनवेलमध्ये आम्ही चालू देणार नाही शेकाप, राष्ट्रवादीचे नखरे, कारण एकत्र आले आहेत देवेंद्र आणि उद्धव ठाकरे’, ‘आता महायुतीच्या दिशेने उडत आहेत पाखरे, दणदणीत हरतील राज ठाकरे’, असा इशारा आपल्या मिश्कील कवितेतून दिला.

महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या : रवींद्र चव्हाण
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने गतिमान पद्धतीने काम करण्याचे योजले होते. ते मागील पाच वर्षांत पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पनवेलचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोंढाणे धरण सिडकोच्या माध्यमातून पूर्ण करण्यास मंजुरी दिली आहे. येणार्‍या काळात पुन्हा एकदा व्हिजन असणारे सरकार राज्यात आणायचे आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद आम्हा सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहू द्या.

देश प्रगतिपथावर : आमदार प्रशांत ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र देशाच्या विकासासाठी मेहनत घेतल्याचे नमूद करून त्यांच्या कार्यामुळे आपला देश आणि राज्य प्रगतिपथावर असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

आपण सगळे भारतीय जनता पक्षाचे स्वयंसेवक असल्याने कोणाचाही जयजयकार न
करता भारतमाता की जय अशी घोषणा द्या.
-आमदार प्रशांत ठाकूर, महायुतीचे उमेदवार, पनवेल

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply