मुंबई महानगरापासून सर्वांत जवळ असलेले आणि शासनाच्या अधिपत्याखाली असलेले थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे गेल्या आठवड्यात अनलॉक झाले आहे. त्यानंतरच्या पहिल्याच वीकेण्डला माथेरानमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत माथेरानमधील पर्यटन बदलले असून पूर्वी काही ठरावीक हंगामात माथेरान पर्यटकांनी फुललेले असायचे आणि 10 वर्षांच्या मागे जाता पावसाळ्यात माथेरान पूर्णपणे बंद असायचे, पण गेल्या काही वर्षांत धुक्यात हरवलेले आणि इतर ठिकाणापेक्षा थंडावा देणारे माथेरान पावसाळ्यात हाऊसफुल्ल असते. यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती बनलेल्या माथेरानमधील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन माथेरानमध्ये सरकारने पायाभूत सुविधांचे जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील वाहनतळ असलेल्या दस्तुरी नाका येथे कोट्यवधी रुपये खर्चून एमएमआरडीएच्या माध्यमातून वाहनतळ विस्तार करण्यात आला आहे, मात्र वाहनतळ वाहने पार्किंग करण्यासाठी आहे की इमारती बांधण्याचे, रस्ते बांधकामाचे साहित्य ठेवण्याची जागा आहे हेच कळून येत नाही. शासनाने केलेला खर्च पर्यटक, वाहनचालक यांना वाहने पार्किंग करण्यासाठी होत नाही हे दुर्दैव असून माथेरानमध्ये येणार्या पर्यटकांची या वाहतूक कोंडीमुळे धावपळ होत असून भविष्यात पर्यटक या वाहतूक कोंडीला कंटाळतील आणि पुन्हा माथेरानकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासन तत्काळ वाहनतळावरील साहित्य बाजूला करून फक्त वाहनांसाठी पार्किंग तळ राखून ठेवणार काय, हे बघावे लागेल. माथेरानचा पर्यटन हंगाम लक्षात घेऊन माथेरानची गुलाबी थंडी, येथील गारवा अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येने येणार्या पर्यटकांना अपुर्या वाहनतळामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागायचे. त्या वेळी पार्किंगची सोय नसल्याने आपल्या किमती गाड्या रस्त्याच्या कडेला लावून जाण्याची वेळ पर्यटकांवर यायची. त्यामुळे वाहनतळाची जागा वाढवून मिळावी म्हणून सातत्याने माथेरान गिरीस्थान नगरपालिका शासनाकडे भूखंडाची मागणी करीत आहे. असे असताना त्या भूखंडाची पाहणी शासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे, मात्र पर्यटन हंगामात वाहने परत जात असल्याने पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेता पर्यटक पार्किंगअभावी परत जाऊ नयेत आणि नुकसान होऊ नये म्हणून काम करून घेण्यात आले. जेसीबी मशीनच्या साह्याने दस्तुरी नाका येथील बोरीचा माळ परिसरात असलेले चढउतार आणि खोलगट भाग यांचे सपाटीकरण करण्यात आले. त्या वेळी वाहने शिस्तीत पार्क करावीत यासाठी वनविभाग आणि पार्किंग यंत्रणा पाहणार्यांना त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. अनेक वर्षांपासून बोरीचा माळ परिसरात शिस्तबद्ध पार्किंग केलेली वाहने पाहता आली.त्यामुळे आता बोरीच्या माळात किमान 500 वाहनांच्या पार्किंगची सोय झाली असून, पर्यटन हंगामात पॅनोरमा पॉइंटच्या रस्त्याच्या आजूबाजूलाही वाहने पार्किंग केली जात असल्याने या पर्यटन हंगामात पार्किंग फुल्ल झाली आहे हे पर्यटकांना ऐकावे लागणार नाही. याचा माथेरानच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होऊन येथील हमाल, रिक्षावाले, घोडेवाले याचेदेखील मोठे आर्थिक नुकसान होत होते, मात्र पर्यटक हा आपला देव असल्याने दिवाळी तसेच नाताळ लगत येणारा नववर्ष या पर्यटन हंगामासाठी वाहनतळ येथे वाहनांची रांग लावून गाड्या जास्तीत जास्त कशा उभ्या राहतील या दृष्टीने कृती करून पार्किंगचा जटिल प्रश्न सोडविण्यात येत होता. हे नेहमीचे कष्ट तसेच अपुर्या जागेमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून दस्तुरी येथील वाहनतळ येथे पेव्हर ब्लॉक लावून वाहनांसाठी जागा वाढवून देण्यासाठी निधी मंजूर केला. माथेरानमध्ये येणारे पर्यटक यांच्या दिमतीला घोडे असतात, पण पर्यटकांसाठी असलेले घोडे हे वाहनांना बंदी असलेल्या या शहरात माल वाहतूक करण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. येथे माल वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे घोडे यांना कोणत्याही स्वरूपाची परवानगी नाही. त्याच वेळी ते अनेक वर्षे अनधिकृतपणे गेली अनेक वर्षे घोड्यांना बेकायदा झोपड्या बांधून उभे करून ठेवत आहेत. त्या सर्व घोड्यांचे मलमूत्र तेथेच पडून राहिल्याने परिसरातील सिम्पसन टँक तलावातील पाणी दूषित झाले आहे. माथेरानच्या दस्तुरी नाका येथे घाटरस्त्याने माल उतरविला जातो. तेथून तो मालवाहू करणार्या घोड्यांच्या पाठीवर टाकून गावात नेला जातो. त्या घोड्यांची कोणतीही परवानगी माथेरान नगरपालिका आणि माथेरान पोलीस ठाणे यांच्याकडे नाही, मात्र गेली अनेक वर्षे हे घोडे बिनदिक्ततपणे व्यवसाय करीत आहेत. त्याच वेळी या घोडेमालकांनी आपले घोडे बांधण्यासाठी पार्किंग भागात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधल्यात. त्या झोपड्यांत बांधलेल्या घोड्यांचे मलमूत्र वाहून जाऊन माथेरानला पाणी पुरविणार्या सिम्प्सन टँक तलावात जाते. त्यामुळे सिम्प्सन तलाव दूषित झाला आहे, मात्र दस्तुरी नाका येथील वाहनतळ विविध प्रकारच्या साहित्यांनी भरले आहे. त्यामुळे वाहने लावायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने पर्यटकांच्या गाड्या दस्तुरी नाका येथे पार्क केल्या जातात. त्या वाहनतळाचे नियोजन माथेरान वन व्यवस्थापन समिती करीत आहे. या वाहनतळाचे सुशोभीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे, मात्र वाहनतळाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वाहने अडकून पडतात. एमएमआरडीएच्या अधिकार्यांची अनुपस्थिती आणि ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे त्याचा फटका पार्किंग व्यवस्थेला बसला आहे. माथेरान हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असून लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. या पर्यटकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी वन व्यवस्थापन समिती यांच्या देखरेखीखाली ही पार्किंग व्यवस्था असते. या पार्किंगचे सुशोभीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत केले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून या पार्किंगचे सुशोभीकरण केले आहे, पण ऑक्टोबर 2019नंतर मार्च 2020मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहनतळ चारीबाजूने कुंपण घालून सिमेंटचा थर आणि त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम करून बंद करण्यात आले. चोहोबाजूंनी गटार काढल्यानंतर त्याच्यावर लोखंडी पट्ट्या टाकून ते गटार बंद करण्यात आले. त्या पट्ट्यांवरून गाड्यांची वाहतूक होत असते, पण गेल्या काही महिन्यांत या लोखंडी पट्ट्यांच्या जाळीवरून गाडी जाताच त्या तुटून गाडी गटारात जाऊन गाडीचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सहा कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या वाहनतळामुळे अधिक संख्येने वाहने थांबू शकणार आहेत तसेच वन व्यवस्थापन समितीला उत्पन्न कमी मिळत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना गाडी पार्क होत नसल्याने माघारी फिरावे लागत होते. त्याचा परिणाम माथेरानच्या पर्यटनावर होत आहे, परंतु वाहनतळ प्रशस्त झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहू शकतील असे वाटले होते, मात्र गेले दीड वर्षे सातत्याने माथेरान हे पर्यटनस्थळ कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे बंद होते. त्यामुळे वाहने पार्किंग करून ठेवण्यासाठी बनविण्यात आलेले वाहनतळ बांधकाम साहित्याने भरले आहे. वाहनतळावरील प्रत्येक भागात पडलेल्या साहित्यामुळे वाहनांची पार्किंगची जागा अर्धी शिल्लक राहिली आहे. बोरीच्या माळावर मालवाहतूक करणार्या घोड्यांनी राहण्याची व्यवस्था केली आहे. ब्रिटिश काळात माथेरानमध्ये सूर्य अस्ताला जाण्याआधी प्रत्येक घोडा हा शहरात राहत नव्हता, मात्र मालवाहतूक करणारे 100हून अधिक घोडे तेथे वस्ती करून राहत आहेत.त्यांचे मलमूत्र तेथेच पडून असते. ते लक्षात घेता वाहने घेऊन येणारे पर्यटक यांच्यासाठी तेथील प्रवास दुर्गंधीमधून होत आहे. जागोजागी पडलेल्या बांधकाम साहित्यामुळे पर्यटकांची वाहने जागोजागी अडकून पडत आहेत, तर माथेरान घाटरस्त्यात वाहतूक कोंडी होत आहे. माथेरानचा मार्ग वाहतूक कोंडीमुळे पर्यटक अडथळ्यांची शर्यत पार करीत माथेरानमध्ये पोहचत आहे. माथेरान पालिका विशेषत: नगराध्यक्ष व गटनेते वाहनतळावर लक्ष ठेवून तेथील जागा व्यापणारे बांधकाम साहित्य बाजूला करणार काय?
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …