Breaking News

भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत

बँकॉक : वृत्तसंस्था

कविंद्र सिंग बिश्त (56 किलो) आणि अमित पांघल (52 किलो) यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कविंद्र आणि अमितसह भारताच्या अन्य चार बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे. सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार्‍या शिवा थापाला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शिवाने 2015च्या रौप्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या झाकिर शफीउल्लीन याला कडवी लढत दिली, पण तिसर्‍या फेरीत केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

पुरुषांमध्ये आशीष (69 किलो), तसेच सतीश कुमार (91 किलोवरील) यांना तर महिलांमध्ये एल. सरिता देवी (60 किलो) आणि गेल्या वर्षीची रौप्यपदक विजेती मनीषा (54 किलो), कनिष्ठ गटातील जगज्जेती निखत झरीन (51 किलो) आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनिया चहल (57 किलो) यांना कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.

दीपक सिंग (49 किलो) आणि आशीषकुमार (75 किलो) यांनी पुरुष गटात, तर पूजा राणी (75 किलो) आणि सिमरनजीत कौर यांनी महिलांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. कझाकस्तानच्या टेमिर्टास झुस्सुपोव्ह याने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्यामुळे रिंगणात न उतरताच दीपकला अंतिम फेरी गाठता आली. सलग दुसर्‍यांदा दीपकला पुढे चाल मिळाली आहे.

कविंद्र सिंग आणि मोंगोलियाच्या एंख-अमर खाखू यांच्यातील सामना रंगतदार झाला, मात्र अटीतटीच्या झालेल्या तीन फेर्‍यांनंतर पंचांनी कविंद्रच्या बाजूने निकाल दिला.

आशीषकुमारने तिन्ही फेर्‍यांमध्ये इराणच्या सेयेशाहिन मोसावी याला निरुत्तर केले. त्यामुळे आशीषला सहजपणे अंतिम फेरीत स्थान मिळवता आले. महिलांमध्ये, मनीषाला तैवानच्या हुआंग सियाओ-वेन हिने हरवले, तर सरिताला चीनच्या यँग वेनलू हिच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पूजाने कझाकस्तानच्या फरिझा शोल्टे हिच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यामुळे पंचांनी एकमताने निर्णय घेत पूजाला विजयी घोषित केले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply