रेवदंडा ः प्रतिनिधी
चौल व रेवदंडा परिसरात गेले काही दिवस कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला होता. घरात कोरोना रुग्ण असल्याने कुटुंबातील व्यक्तींनाही क्वारंटाइन व्हावे लागले. कोरोनाग्रस्त रुग्णांवर घरातच उपचार सुरू होते. या वेळी औषधोपचारासह जीवनावश्यक वस्तूंची कुटुंबाला गरज भासे. अशा वेळी चौलच्या शैलेश काठे यांनी जीवाची तमा न बाळगता देवदूताप्रमाणे कोरोना रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धाव घेतली. कोरोनाग्रस्त व्यक्तीस फोन करून त्याला औषधोपचार पुरविण्याची जबाबदारी घेतली. कोरोना रुग्णांसाठी लागणारी औषधे घेऊन त्यांनी त्यांचे घर गाठले. इतकेच नव्हे तर कुटुंबीयांना लागणार्या जीवनावश्यक वस्तूही पोहचविल्या. संकट काळात अगदी देवदूतासारखे शैलेश काठे यांनी स्वतःला झिजवले. या वेळी पावसाचीही तमा त्यांनी बाळगली नाही. चौलमधील गल्लोगल्लीत चिखल तुडवत त्यांनी कोरोनाग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी शैलेश काठे यांनी केलेल्या मदतीबाबत आभार व्यक्त केले. संकट काळात केलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद देण्यात आले. चौलच्या शैलेश काटे यांनी कोरोना योद्धा म्हणून केलेल्या कार्याचे सर्वांनीच कौतुक केले. अनेकांनी त्यांच्या या कार्याला सलाम केला. कोरोनाच्या संकटात शैलेश काठे यांनी दाखविलेल्या या माणुसकीने कोरोना रुग्णही गहिवरले. शैलेश यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. अशा परिस्थितीतही त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.