कर्जत : बातमीदार
तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे हिरवीगार झालेली भाताची रोपे पावसाअभावी सुकू लागली आहेत. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास काही शेतकर्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. कर्जत तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. त्यासाठी बाजारातून भाताचे बियाणे विकत आणून शेतकर्यांनी पेरणी केली होती. मात्र मागील 25 जूनपासून कर्जत तालुक्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतात पाणी नसल्याने हिरव्यागार रोपांना आता पिवळा रंग येवू आहे. काही शेतकरी विहिरीचे पाणी शेतात सोडून भाताची रोपे जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्या शेतकर्यांच्या जमिनी माळरानावर आहेत, त्यांना भाताचे रोप डोळ्यासमोर सुकताना दिसून येत आहे. जुलै महिना सुरू झाला तरी कर्जत तालुक्यात पावसाने 1000 मिलिमीटरचा पल्ला गाठला नाही. त्यामुळे यावर्षीसुद्धा पाऊस तोंडचा घास हिरावून घेणार काय? याची भिती शेतकर्यांना भेडसावू आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी आठवडा पावसाची लक्षणे नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी भाताच्या रोपांना जगविण्यासाठी प्रयत्न करावेत.
-शेखर भडसावळे, कृषीरत्न शेतकरी, नेरळ, ता. कर्जत
आमच्या भागात उशिरा भात पेरणी केली आहे. भाताची रोपे जमिनीबाहेर येतानाच पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे आमच्या भागातील शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
-मधुकर घारे, शेतीनिष्ठ शेतकरी, सांगवी, ता. कर्जत
शेतकर्यांच्या मागे हवामान लागले असून राज्य शासनाने आता शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली पाहिजे.
-परशुराम म्हसे, जिल्हा अध्यक्ष, भाजप किसान मोर्चा