मुरूड : प्रतिनिधी
येथील समुद्रकिनारी डांबर सदृश्य चिकट जाडसर ऑइल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी मुरूडमधील कोळी बांधव कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्रकिनारी जाळी टाकून (पेर्याने) मासेमारी करतात मात्र मुरूड समुद्रकिनार्यावर खराब ऑइल वाहून आले आहे. खोल समुद्रात तेल विहिरी आहेत. या विहिरीतून गळती झाल्यास ऑइलचे तवंग समुद्रकिनारी येतात. व तेथील पाणी दुषीत झाल्याने मच्छी खोल समुद्रात निघून जाते. मुरुड समुद्र किनार्यावर सध्या डांबर सदृश्य चिकट जाडसर ऑइल वाहून आले असून, किनार्यालगतचे मासे खोल समुद्रात निघून गेले आहेत. समुद्रकिनारी पेर्याने मासळी पकडताना सर्व जाळी ऑइलने माखली जात आहेत. सातत्याने येणार्या या ऑइलमुळे समुद्रकिनार्यावर फिरणे खूप कठीण होत आहे. मुरूड समुद्रकिनारी जाळी टाकून मच्छिमारी करणारे कोळी बांधव अडचणीत आले आहेत. राज्य शासनाने पावसाळी हंगामात गरजू कोळी बांधवांना तेलविहिरी कंपन्यांकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी सागर कन्या मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी केली आहे.