कर्जत : बातमीदार
उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी भाताची शेती करण्यासाठी सोडले जाते. या वर्षी पावसाळ्यात कालव्यांना पडलेल्या खांडींची दुरुस्ती वेळेवर झाली नाही, त्यामुळे दुबार शेतीसाठी पाणी येणार नाही. 35 गावांतील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्या राजनाला कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते, मात्र पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने मशिनरी दिली नाही. त्यामुळे या वर्षी जानेवारी महिना संपला, तरी राजनाला कालव्यात पाणी खळाळत नाही. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातून वीज निर्माण केल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी पेज नदीमधून वाहत जाते. तेच पाणी राजनाला कालवा बांधून शेतीसाठी वळविण्यात आले आहे. हे पाणी मुख्य कालव्यातून उजवा, डावा आणि पोटल कालव्यात सोडले जाते. या पाण्याचा वापर दुबार शेतीसाठी करण्यात येतो. 2011 मध्ये दुरुस्तीसाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले नव्हते. दुरुस्तीचे काम वेळेवर झाले नाही, म्हणून सलग तीन वर्षे कालव्यातील पाणी बंद ठेवले गेले. त्यामुळे राजनाला कालवा परिसरातील शेतकर्यांच्या जमिनी नापीक बनल्या होत्या, तसेच चित्र या वर्षी निर्माण झाले आहे. गेल्या पावसाळ्यात राजनाला कालव्यांना तब्बल 125 ठिकाणी मोठ्या खांडी पडल्या आहेत, तर 15 ठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. कालवा दुरुस्तीची कामे करून घेण्याची मागणी स्थानिक शेतकरी ऑक्टोबर 2021 पासून करीत होते, मात्र पाटबंधारे खात्याच्या उदासीनतेमुळे अद्यापपर्यंत दुरुस्तीची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे यंदा राजनाल्याचा मुख्य कालवा, उजवा कालवा आणि पोटल कालव्यात पाणी सोडलेले नाही. पाटबंधारे खात्याचा यांत्रिकी विभाग निविदा काढून राजनाला कालव्याच्या दुरुस्तीची कामे करून घेत असतो, मात्र या वर्षी निविदा काढण्यास उशीर झाला, तसेच पाटबंधारे खात्याच्या पुणे येथील यांत्रिकी विभागाने कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या कामासाठी अवजड मशीन उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती नोव्हेंबर महिन्यात झाली नाही. डिसेंबर महिन्यात पाणी सोडले तर भाताची शेती करता येते, मात्र जानेवारी महिना संपला, तरी राजनाला मुख्य नाला, तसेच उजवा आणि डावा कालव्यात पाणी सोडले गेले नाही. राजनाला कालव्याला पाणी आलेच नाही तर या भागातील जनावरे, विहिरी, बोअरवेल यांनादेखील पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे आणि सदैव हिरवागार असलेल्या राजनाला कालव्याचा 35 गावांचा परिसर पाणीटंचाई सदृश होणार आहे. सध्या पाटबंधारे विभागाकडून एक जेसीबी आणि लहान पोकलेन यांच्या सहाय्याने राजनाला कालव्याला पडलेली भगदाडे बंद करण्याचे काम सुरू आहे, मात्र कालव्याचे मोठे भाग वाहून गेल्याने दुरुस्ती करणे सहज शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन पाणी सोडण्यात येणार नाही, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे.