Breaking News

प्रकृती, संस्कृती आणि विकृती

बॉलिवुडमध्ये पदार्पण करू इच्छिणार्‍या नवोदित तरुणींना आमिषे दाखवून त्यांच्याकरवी अश्लील चित्रकहाण्या तयार करून एका विशिष्ट अ‍ॅपद्वारे ते बाजारात आणण्याचा उद्योग राज कुंद्रा याने केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात बॉलिवुडमधील अनेक जणांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हात अडकल्याचेही बोलले जाऊ लागले आहे. खरे खोटे चौकशीत बाहेर येईलच.

एक भाकरी दोघांमध्ये वाटून खाल्ली तर ती प्रकृती, आपल्या वाट्याची अर्धी भाकरी भुकेल्याला देणे ही संस्कृती, आणि दुसर्‍याच्या ताटातील भाकरी ओढून घेणे ही विकृती. अशी साधी-सोपी-सरळ व्याख्या पूज्य विनोबा भावे यांनी केली होती. संस्कृती आणि प्रकृतीचा अर्थ सांगणार्‍या या सुंदर व्याख्येचा संदर्भ काळाच्या ओघात पूर्ण बदलून गेला आहे. समाजमाध्यमे ही प्राधान्याने माहितीच्या आदानप्रदानासाठी किंवा परस्परांमधील संपर्कासाठी वापरली जावी अशीच त्यांच्या निर्मात्यांची अपेक्षा होती. या माध्यमांनी पुढे कात टाकली आणि डिजिटल क्रांतीमुळे जगभराचा चेहरामोहराच बदलून गेला. मनोरंजन आणि व्यवहार या दोन उद्देशांनी या माध्यमांची प्राथमिक उद्दिष्टे पार मागे टाकली. बँकिंगपासून सरकारी दस्तावेजांपर्यंत आणि शेअरबाजारापासून बातम्यांपर्यंत बव्हंशी व्यवहार आता डिजिटल माध्यमांतून होऊ लागले आहेत. हातातला मोबाइल हा संपर्कापेक्षा मनोरंजनाचे साधन अधिक बनला आहे. या बदलाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटे देखील. नुकत्याच उजेडात आलेल्या राज कुंद्रा पोर्न प्रकरणामधून हीच बाब अधोरेखित होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने गेल्या वीस वर्षांत अनेक उद्योग केले. त्यामध्ये पश्मिना शालींच्या विक्रीपासून पोर्नपटांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. पंजाबातील भटिंडा येथून लंडन येथे गेलेल्या एका श्रमिक पंजाबी पित्याचा राज कुंद्रा हा मुलगा. त्याचे वडील लंडनमध्ये बस कंडक्टर होते. अशी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या राज कुंद्रा याने पुढल्या दोन दशकांमध्ये कोट्यवधींची माया कशी जमवली ही एक सुरस कहाणीच म्हणावी लागेल. पोर्न प्रकरणी गळ्यापर्यंत बुडालेल्या राज कुंद्रा यांच्याविरुद्ध पोलिसांना भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. कुंद्रा याच्या चित्रपटांत काम करणार्‍या एक नटीने शृंगारप्रधान चित्रपट आणि अश्लीलपट यात फरक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे. तिच्या मते नेटफ्लिक्स किंवा तत्सम ओटीटी मंचांवर याहून भडक आणि अश्लील दृश्ये दाखवली जातात. तिच्या या मुद्द्यामध्ये काही आधुनिक विचारांच्या लोकांना तथ्य वाटेलही, परंतु तिथेच बुद्धिभेद होतो. मुळात अशा प्रकारचा आक्षेपार्ह आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्योग किती शहाणपणाचा आहे? आजच्या घडीला शाळकरी मुलांच्याही हातामध्ये मोबाइल फोन असतो. त्यांना इंटरनेटची सुविधाही सहजी उपलब्ध होते. राज कुंद्रा निर्माण करत असलेल्या कथित चित्रफिती संस्कारक्षम वयामध्ये मुलांच्या हाती पडल्या तर त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. हा निव्वळ नैतिक किंवा अनैतिकतेचा मामला नव्हे. भारतीय समाजामध्ये लैंगिकतेबाबत बर्‍यापैकी दांभिकपणा मुरलेला आहे असा युक्तिवाद काही पुरोगामी मंडळी करतात. विरोधी मते व्यक्त करणार्‍यांची तोंडे बंद करण्यासाठी हा युक्तिवाद चपखल म्हणता येईल. परंतु मुळात असा भिकार आशय निर्माण करण्यामध्ये कुणी आपले रक्त का आटवावे? त्याने काय साध्य होते याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply