मुंबई ः प्रतिनिधी
भांडूपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडूप पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याच्या व्हिडीओने पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे भांडूपकरांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीदरम्यान भांडूप पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित पोलिसांची नावे पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे आणि पंकज शेवाळे, तर हेडकॉन्स्टेबल घोसाळकर, कॉन्स्टेबल गायकवाड आणि जुमले अशी आहेत.
गेल्या आठवड्यात सोनापूर येथील रहिवासी असलेल्या आयान खान उर्फ उल्ला या गुंडाचा वाढदिवस पोलीस ठाण्याच्या चौथ्या मजल्यावरील एका खोलीत साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना केक भरवताना, गळाभेट देत शुभेच्छा देतानाचे व्हिडीओ, फोटो उल्लानेच व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवले होते. पुढे तेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पोलिसांवर टीका सुरू झाली. त्याच्याविरुद्ध खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एकाही प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले नाही. उल्ला हा काही पोलिसांसाठी हप्ते गोळा करण्याचे काम करतो, अशी चर्चाही भांडूपमध्ये आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांकड़ून संबंधित पोलिसांची अखेर खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती.