Breaking News

राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची रेवदंड्यात जोरदार तयारी

रेवदंडा : प्रतिनिधी

अमेझिंग नेचर संस्थेच्या विद्यमाने 11 आणि 12 जानेवारी रोजी रेवदंडा येथे 33वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रेवदंडा मोठे बंदर येथील भंडारी समाज सभागृहात या संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. रेवदंडा येथील अमेझिंग नेचर संस्थेने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय पक्षीमित्र संमेलनाचा शुभारंभ शनिवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी वर्धा येथून आलेल्या सायकल रॅलीचे स्वागत संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत वडतकर करणार आहेत. या उद्घाटन समारंभात महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेच्या वतीने दिले जाणारे तीन पुरस्कार वितरण तसेच पक्षीविषयक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या संमेलनाआधीच्या दिवशी शुक्रवारी (दि. 10) फणसाड अभयारण्य व आक्षी समुद्रकिनारा अशा दोन ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, तर संमेलनात विविध चर्चासत्रे, सादरीकरण, परिसंवाद, विहंगसार व प्रगट मुलाखत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातून सुमारे 300 प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर (9967569570) संपर्क साधावा. या संमेलनात जास्तीत जास्त पक्षीप्रेमी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमेझिंग नेचर संस्थेने केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply