कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या संकटामुळे रिसॉर्टमधील बुकिंग रद्द झाले आहे. स्थानिक फार्म हाऊस मालक आता त्या ठिकाणी भाजीपाला पिकवत आहेत.
कर्जत तालुक्यातील पोसरी गावात राहणारे शेतकरी आणि शेतीच्या माध्यमातून उद्योजक क्षेत्रात उतरलेले अनिल प्रभाकर कडू यांनी आपल्या लाडीवली येथील वसंत रिसॉर्टमध्ये भाजीपाला लागवड करून उत्पादन घेतले आहे. प्रभाकर कडू यांची शेती आणि तिला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय होता. वडील शेती करत असताना ती आधुनिक पद्धतीने केली तर त्यात अधिक उत्पादन होऊन पैसे चांगले मिळतील असा विचार त्यांचा पुत्र अनिल कडू यांच्या मनात आला आणि तो त्यांनी प्रत्यक्ष उतरवला. त्यांनी शेती करत असताना लाडीवली गावाजवळ नऊ एकर जागा घेतली. त्यात चार एकरमध्ये आंबा, चिकू, नारळ आदी झाडांबरोबर त्यांनी केळीची लागवड केली. एक एकरमध्ये वांगी, टोमॅटो, भेंडी आदी भाजीपाला पिकवला. दोन एकर मोकळे मैदान ठेवले, तर दोन एकरमध्ये वसंत फार्म हाऊसवजा रिसॉर्ट उभा केला असून त्यामध्ये 22 रूम आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुकिंग रद्द झाले आहे. त्यामुळे अनिल कडू आता पूर्ण वेळ फळ झाडे, भाजीपाला लागवड व देखरेख करण्यात घालवत आहेत. पारंपरिक शेतीला काही प्रमाणात बाजूला ठेवून आधुनिक शेतीकडे आपली पावले वळविली की उत्पादन आणि पैसा जास्त मिळतो, हे कडू यांनी सिद्ध केले. आधुनिक शेतीतून त्यांनी समाजात प्रतिष्ठादेखील मिळविली आहे.