Breaking News

निकृष्ठ कामाकडे मुरूड नगर परिषदेचे दुर्लक्ष

भाजप नेते कंधारे यांचा जनआंदोलनाचा इशारा

मुरूड जंजिरा ः प्रतिनिधी

मुरूड नगरपरिषदेला विविध विकासकामांसाठी निधी आला आहे, परंतु प्रत्येक काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नगर परिषदेतील कर्मचारी दक्षता घेत नाहीत. शहरातील गटारांचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी केला आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास जनांदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुरूड नगर परिषदेकडून सध्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जी गटारे आहेत, त्या गटारांना काँक्रिटचे कव्हरिंग करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने समुद्रातील वाळू वापरून हे काम पूर्ण करीत आहे. या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना भाजप ज्येष्ठ नेते कंधारे यांनी सांगितले की, सबनीस आळी भागात गटारांची कामे सुरू असताना भाजप मुरूड शहराध्यक्ष उमेश माळी व बाळा भगत यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. याबाबत नगर परिषदेला माहिती दिल्यावर सध्या हे काम बंद ठेवण्यात आले आहे.

नगर परिषदेने शहरात विविध ठिकाणी सुरू  असलेल्या कामांवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे. शहरातील विकासकामे दीर्घ काळ टिकण्यासाठी त्याचा दर्जा उत्तम असणे खूप गरजेचे आहे. शासनाचे पैसे अशाप्रकारे वाया जाऊ देणार नाही. मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा आण्णा कंधारे यांनी दिला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply