Monday , February 6 2023

मासेमारीसाठी उरणमध्ये मच्छीमारांची लगबग

उरण ः वार्ताहर

1 जूनपासन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होणार आहे. पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्‍या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग सुरू झाली आहे. समुद्रातील 35 ते 40 वाव पृष्ठभागावरील मासेमारीला पर्सियन नेट फिशिंग म्हणतात, तर 50 ते 70 वाव खोल समुद्रात मासेमारी केली जाते. खोल समुद्रातील मासेमारीला डीप फिशिंग म्हटले जाते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो. शांत झालेल्या सागरात पर्सियन नेट फिशिंगसाठी विशेषता नारळी पोर्णिमेनंतर पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार खोल समुद्रातील आणि पर्सियन फिशिंग या दोन प्रकारातील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात. याबाबत माहिती देताना करंजा मच्छीमार संस्थचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी सांगितले की, 1 ऑगस्टपासूनच मासेमारी सुरू होणार आहे, मात्र मच्छीमार आठ दिवसांपासूनच मासेमारीसाठी तयारीला लागले आहेत. बोटींच्या डागडूजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांची मोरा, करंजा, कसारा, ससून डॉकसह विविध मच्छीमार बंदरात लगबग सुरु झाली आहे. 1 ऑगस्टपासूनच मच्छीमार बोटींना डिझेलचा कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी बोटींची कसारा आणि ससून डॉक बंदरात गर्दीला सुरुवात झाली आहे. डिझेल, आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध होताच तत्काळ हजारो मच्छीमार बोटी 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी रवाना होणार आहेत, असेही कोळी म्हणाले.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply