टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. सिंधूने पोलिकार्पोवाचा 21-7, 21-10 असा पराभव करून दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त 29 मिनिटांत सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली. रिओ (ब्राझील) ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी. व्ही. सिंधूकडून यावेळीही भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून या वेळी तिच्यासोबत इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग यांचा समावेश आहे. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. सुरुवातीला धीम्या गतीने खेळणार्या सिंधूने नंतर मात्र वेग पकडला. दोन्ही गेम्स सहज जिंकत सिंधूने आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये का गणले जात आहोत याची चुणूक दाखवून दिली. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 12 पॉइंट्स मिळवत 17-5 अशी आघाडी घेतली होती. पहिला गेम 21-7ने जिंकल्यानंतर दुसर्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम ठेवत 21-10ने विजयाची नोंद केली आणि 29 मिनिटांत सामना पूर्ण केला. आता बुधवारी (दि. 28) सिंधू हाँगकाँगच्या खेळाडूचा सामना करणार आहे. त्यासाठी ती सज्ज आहे.