उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व कार्याचा प्रसार, प्रचार करणार्या, गड किल्ले यांचे संवर्धन, संरक्षण करणार्या सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत दसर्याच्या शुभ मुहूर्तावर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जातात.त्याच अनुषंगाने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, उरण विभागामार्फत सालाबादप्रमाणे दसर्याच्या शुभमुहूर्तावर गडपुजन व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
आवरे गावालगत असलेल्या ऐतिहासिक तटबंदी वर ज्या वास्तूला कील्याची डोंगरी (डोंगर) किंवा मर्दनगड म्हणून संबोधले जाते. त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी आवरे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. तालुक्यातील नवोदित शाहीर उमंग भोईर यांचा सुमधुर वाणीतून पोवड्याने वातावरण निर्मिती झाली. त्या नंतर तटबंदी वर गडपूजन व शस्त्रपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कौशिक ठाकूर यांनी भूषविले.
कार्यक्रमासाठी उरण तालुक्यातील 25 शिवभक्त व आवरे गावातील ग्रामस्थ हजर होते. गड पूजनाच्या कार्यक्रमानंतर आवरे गावातील भोलेनाथ मंदिरात शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाहीर उमंग भोईर यांचा पोवड्यांचा कार्यक्रम झाला व कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमादरम्यान सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत शाहीर उमंग भोईर व कौशिक ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सूत्रसंचालन संघटनेचे माजी अध्यक्ष नीलेश ठाकूर यांनी केले तर या ऐतिहासिक वास्तूबद्दल इतिहास अभिषेक ठाकूर व कौशिक ठाकूर यांनी उपस्थितांना सांगितला व या वास्तूचे जतन, संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निश्चय केला गेला.