Breaking News

निसर्गावर खापर फोडू नका!

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. या दुर्घटनांमध्ये 95 जणांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले. महाड शहरात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळतात, पूर येतात. त्यात जीवित व वित्तहानी होते. त्यानंतर पंचनामे होतात. नुकसानभरपाई दिली जाते. सारा दोष निसर्गाला देऊन सर्व गप्प बसतात. निसर्गावर खापर फोडले जाते. हे असे किती दिवस चालणार? यावर उपाययोजना करावी लागेल. दरडीचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनाबाबत, तसेच महाड शहराचे पुरामुळे हणारे नुकसान टाळण्याबाबत आता तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यात काही अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील.

21 आणि 22 जुलैला रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावावर भली मोठी दरड कोसळली. यात 32 घरे दरडीखाली गाडली गेली. या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथेही दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. याच पोलादपूरमधील साखर सुतारवाडी गावावरही दरड कोसळली. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले. पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची आणि महाड तालुक्यातील हिरकणीवाडी गावांवरही दरडी कोसळल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. दरडींखाली 95 जणांचे बळी गेले.

2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांमध्ये दरडी कोसळून अनेक घरे दरडीखाली गाडली गेली. यात 212 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करून रायगड जिल्ह्यातील 84 गावे दरडप्रवण म्हणून घोषित केली होती. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. रायगड जिल्ह्यात दरडीचा धोका असणारी 103 गावे आहेत. यातील 20 गावे दरडींच्या अनुशंगाने अत्यंत धोकादायक आहेत. दरवर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाने आता याबाबत विचार करायला हवा.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व डोंगर उतारावर असलेल्या गावांचे पुन्हा एकदा भूवैज्ञानिक सर्वेक्षण   करणे गरजेचे आहे. ज्या गावांना दरडीचा धोका सर्वाधिक आहे, त्या गावांमधील लोकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याबाबत शासनाने विचार केला पाहिजे. शक्यतो त्याच गावात पुनर्वसन होईल, असे पाहिले पाहिजे. तसे झाल्यास लोक पुनर्वसनास तयार होतील.

सावित्रीची खोली वाढवा

महाड शहरला पूर नवीन नाही. दरवर्षी सावित्री नदीला पूर आला की महाड शहारात पाणी घुसते. त्यामुळे महाडकरांना पूर नित्याचा झाला आहे. 1958 व 2005 साली महाड शहरात मोठा पूर आला होता. त्याहीपेक्षा यंदाचा पूर मोठा होता, असे महाडधील ज्येष्ठ नागरिक सांगतात. महाड शहर सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. सावित्री नदी महाबेळश्वमध्ये उगम पावते. केवळ महाड किंवा पोलादपूर तालुक्यांमध्ये पडणार्‍या पावसामुळे सावित्रीला पूर येत नाही, तर महाबळेश्वरमध्ये पाऊस पडला, तरी सावित्री दुथडी भरून वाहते. सावित्रीला पूर येतो, तेव्हा समुद्राला भरती असेल, तर महाड शहरात पुराचे पाणी शिरते. दासगावला सावित्री नदीवर कोकण रेल्वेने पूल बांधला आहे. तो बांधताना मोठ्या प्रमाणावर नदीत भराव करण्यात आला. शहर व आसपासच्या परिसरात होत असलेल्या बांधकांमांसाठी नदीमध्ये भराव केल्यामुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी लवकर वाढते. नदीमध्ये बेटं आहेत. त्यामुळे प्रवाह अडला जातो. ही बेटं खाजगी मालकीची आहेत. ती काढली तर नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर होतील. जेथून पुराचे पाणी शहरात घुसते, तेथे सावित्रीच्या किनारी संरक्षण भिंती बांधल्या पाहिजेत. शक्य झाल्यास महाड शहराच्या बाजारपेठेचे स्थलांतर करायला हवे. त्यामुळे दरवर्षी पुरामुळे होणारे व्यापार्‍यांचे नुकसान टाळता येऊ शकते.

दरडी कोसळणे आणि पूर येणे, याला केवळ निसर्ग जबाबदार नाही. या आपत्तीचे खापर निसर्गावर फोडून सरकारी यंत्रणेने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. दरडी पडण्यास केवळ पाऊस जबाबदार नाही, तर अमाप वृक्षतोड, डोंगरांमध्ये होणारे उत्खनन हीदेखील त्याची कारणे आहेत. पाऊस रोखणे आपल्या हातात नाही, परंतु वृक्षतोड व उत्खनन रोखता येते. ते रोखले पाहिजे. त्याचप्रमाणे नाद्यांमध्ये टाकले जाणारे भराव रोखणे, किनार्‍यावर होणारी बेेसुमार बांधकामे रोखणे सरकारच्या हातात आहे. सरकारला खऱंच काही करायचं असेल, तर काही अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील.

रोगराईची भीती

महाड शहरात पुरामुळे मोेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. व्यापार्‍यांनी आपला भिजलेला माल बाहेर रस्त्यावर फेकला आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य आहे. पुरामुळे घरात ओल आहे. यामुळे शहारात रोगराई पसरण्याची भिती आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात.

तातडीची आर्थिक मदत द्या

पुरामुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातून सावरण्यासाठी या लोकांना आर्थिक मदतीची गरज आहेे.  पंचनामे करून नंतर जी मदत देता येईल, ती द्यावी, परंतु सध्या तातडीची आर्थिक मदत शासनाने रोख स्वरूपात दिली पाहिजे.

मदतीचे नियोजन हवे

महाड तालुक्यातील पूरग्रस्त, तसेच दरडग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. सरकारी पातळीवर, स्वयंसेेवी संस्था, आध्यात्मिक संस्था मदत करीत आहेत. अनेक लोक वैयक्तिक मदत करीत आहेत, पंरतु नियोजन नसल्यामुळे गरजवंतांना मदत मिळत नाही. ज्या ठिकाणी वाहने जाऊ शकतात, तेथे मदत होतेय. परंतु बाजारपेठ, कुंभारआळी आदी भागांमध्ये वाहन जात नसल्यामुळे तेथे मदत जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी मदत पोहचली पाहिजे. उबदार कपडे, अंथरूण, कोरड्या कपड्यांची गरज या लोकांना आहे. गरज पाहून मदत केली पाहिजे. त्यासाठी मदतीचे नियोजन व्हायला हवे.

-प्रकाश सोनावडेकर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply