पनवेल ः प्रतिनिधी
शेकापचे माजी आमदार व कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बुधवारी (दि. 28) सायंकाळी 7च्या सुमारास तळोजा तुरुंगात आणण्यात आले. येथे त्यांना तुरुंगातील कैद्यांसाठी असलेल्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांचा कर्नाळा बँक घोटाळा आणि भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम सत्र न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिलेला आहे. दरम्यान, प्रकृतीचे कारण पुढे करीत आर्थर रोड जेलऐवजी माझ्या घरावळील तळोजा जेलमध्ये मला हलवावे, अशी मागणी विवेक पाटील यांनी सत्र न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार जेल प्रशासनाने दिलेल्या अहवालानंतर न्यायालयाने त्यांना तळोजा जेलमध्ये हलविण्याची परवानगी दिली होती. आरोपी विवेक पाटील यांना गुरुवारी सायंकाळी 7नंतर आर्थर रोड जेलमधून तळोजा तुरुंगात आणण्यात आले आहे. तळोजा तुरुंगात त्यांना कैद्यांसाठी असलेल्या रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता 5 ऑगस्ट रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार्या पुढील सुनावणीपर्यंत त्यांचा मुक्काम तळोजा तुरुंगात असणार आहे.
वाढदिवसानंतर आता शेकापच्या वर्धापन दिनीही तुरुंगातच
गेल्या महिन्यात 19 जून रोजी विवेक पाटील यांचा वाढदिवस होता. त्या वेळी ते जेलमध्ये होते आणि आता येत्या 2 ऑगस्टला शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे. या दिवशीही शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार असलेल्या विवेक पाटील यांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे.