नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको अर्बन हाट येथे 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत विशेष व दर्जेदार स्वदेशी हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या विविध राज्यांतील 50 हून अधिक कारागीर आपल्या विशेष व दर्जेदार उत्पादनांसह सहभागी होणार आहेत. प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे कलाकार तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्या रसिकांकडून कोविड-19 संबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची पुरेपूर खबरदारी आयोजकांकडून घेण्यात येणार आहे.
सध्याच्या सणासुदीच्या कालावधीतील मागणी लक्षात घेता उपरोक्त दहा राज्यांतील कारागिरांनी निर्मिलेल्या सुती व रेशमी साड्या, ड्रेस मटेरिअल, दुपट्टा, बेडशीट, पडदे, कृत्रिम दागिने, दिवे, दिवाळीसाठी सजावटीच्या वस्तू, मेणबत्त्या, उदबत्त्या, चामड्याच्या व ज्युटच्या पिशव्या, कोल्हापुरी चपला, बांबूची उत्पादने इ. प्रदर्शनार्थ मांडण्यात येणार आहेत. फुड प्लाझा सेक्शनमध्ये विविध प्रांतांतील खाद्यपदार्थही खवय्यांच्या रसनातृप्तीसाठी असणार आहेत. अर्बन हाटच्या निसर्गरम्य परिसरात मुक्तपणे विहरणार्या फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहण्याची संधीही निसर्गप्रेमींना मिळणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्या रसिकांनी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आणू नये अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.