पनवेल ः रामप्रहर वृत्त
महानगरपालिका अंतर्गत पनवेल शहरातील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी टॅक्सच्या दिलेल्या चुकीच्या बिलांमध्ये सुधारणा करावी, तसेच नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पगडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेने आपल्या हद्दीतील खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा नोड व पनवेल शहरातील सर्व मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी टॅक्सची बिले पाठविली आहेत. महापालिकेच्या 5 एप्रिल 2021 रोजीच्या विशेष सभेतील (ठराव क्रमांक 310 दिनांक 06/04/2021) विषयांतर्गत एकत्रित मालमत्ता कराच्या वार्षिक भाडेमूल्याच्या दरामध्ये सुधारणा केलेल्या असून त्यात 30 टक्के एकत्रित वार्षिक भाडेमूल्याच्या दरात कपात केलेली आहे. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे महानगरपालिका अधिनियमानुसार आयुक्तांना असलेले अधिकार वापरून प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये वार्षिक भाडेमूल्याचा दर प्रत्येक वर्गवारीनुसार 30 टक्के कमी केलेला आहे. पनवेल शहर सोडून सिडकोनिर्मित नागरी वसाहती म्हणजे खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा नोड येथे 30 टक्के वार्षिक भाडेमूल्याच्या दरात कपात करून प्रॉपर्टी टॅक्सची बिले प्रॉपर्टीधारकांना पनवेल महापालिकेने पाठविलेली आहेत. ते काम संबंधित विभागाकडून युद्धपातळीवर सुरू झालेले आहे, तसेच प्रॉपर्टीधारकांनी 31 जुलै 2021पर्यंत बिलाची रक्कम भरली, तर 15 टक्के सवलत जाहीर केलेली आहे. ऑनलाईन पेमेंट भरले, तर अतिरिक्त दोन टक्के सूट महापालिकेने जाहीर केलेली आहे. त्याचा फायदा अनेक मालमत्ताधारक घेत आहेत, मात्र पनवेल शहरातील नागरिक जर प्रॉपर्टी टॅक्सची बिले भरण्यासाठी कर विभागात गेले, तर त्यांना जुन्या दराप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्सची बिले भरण्यास कर विभागाचे अधिकारी सांगत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. जर पनवेल शहरातील नागरिक टॅक्स भरत असतील, तर त्यांनाही प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलात वार्षिक भाडेमूल्याचा दर (म्हणजे 30 टक्के कपात) कमी करून दिला गेला पाहिजे, मात्र दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. त्या नागरिकांना सांगितले जाते की, तुम्ही आता प्रॉपर्टी टॅक्स भरा. नंतर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात तुम्हाला बिले कमी करून मिळतील. हे अत्यंत नियमबाह्य व चुकीचे आहे. पनवेल शहरातील सर्वसामान्य प्रॉपर्टीधारक जर प्रॉपर्टी टॅक्सची बिले भरण्यास तयार असतील, तर त्यांना ऑन दी स्पॉट म्हणजे कर विभागात सुधारित दराने प्रॉपर्टी टॅक्सची बिले उपलब्ध करून दिल्यास मोठ्या संख्यने नागरिक मालमत्ता कर भरण्यास तयार होतील व पनवेलकर नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळू शकतो, तसेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल सवलतीसह भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत आहे, ती मुदत अजून दोन महिने 30 सप्टेंबर 2021पर्यंत वाढवावी. म्हणजे महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिक 17 टक्के सवलत मिळत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात टॅक्स भरण्यास तयार होतील व प्रॉपर्टी टॅक्स मोठ्या प्रमाणात महापालिकेस मिळून टॅक्सच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्यास मदत होईल, असे नमूद करून दोन्ही विषयांबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित विभाग अधिकारी यांना योग्य ते निर्देश देऊन त्वरित कार्यवाही करावी, असे पगडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.