Breaking News

पडक्या भिंती बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे; महाड पूरग्रस्तांची संघर्षकथा

पनवेल : नितिन देशमुख

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून 52 जणांचा मृत्यू झाला आणखी 42 जण बेपत्ता आहेत. महाड शहर पुराने धुवून नेले. होत्याचे नव्हते झाले. तेथील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे, महाड पूर्वपदावर येण्यास अजून काही दिवस लागतील. पोलादपूर तालुक्याठी दरड कोसळून काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तेथील परिस्थिती पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी महाडला निघालो. पेणपासूनच मुंबई-गोवा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने हळूहळू जात होती. त्यामध्ये महाड, पोलादापूर आणि चिपळूणला मदत घेऊन निघालेली अनेक वहाने होती. महाड जवळ येऊ लागले तसे वाहनांची गर्दी वाढू लागली. अनेक भिजलेली वहाने टोईंग करून मुंबईकडे घेऊन जात असताना दिसत होती. दासगावची खिंड ओलांडताच 2003  मध्ये जुई गाव दरड पडून 100  पेक्षा जास्त आणि दासगाव मध्ये ही 15 पेक्षा जास्त बळी गेले होते डाव्या बाजूला  दरडग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी बांधलेली घरे त्याची आठवण करून देतात. आज ही दरडग्रसतांची कुटुंबे त्याच ठिकाणी राहत आहेत. दासगावनंतर महामार्गावर सावित्री नदीच्या किनार्‍यावर असलेल्या नील कमल, निसर्ग व इतर धाब्यांची अवस्था पाहूनच महाडमधील परिस्थितीचा अंदाज येतो. महामार्गावर  मदत घेऊन आलेल्या गाड्यांची लागलेली रांग, लोकांची गर्दी आणि आजूबाजूला सुरू असलेला गोंधळ महाड जवळ आल्याची खूण होती. आम्ही महामार्ग सोडून महाड गावात गांधारी पुलावरून जाणार्‍या रस्त्याने खाली उतरलो. संपूर्ण रस्ता उखडलेला होता. महाड नगरपालिका असली तरी हा रस्ता जिल्हा परिषदेचा असल्याने त्याची दुरुस्ती कोणी करायची या वादात किती वर्षे तसाच आहे. पुढे अनेक उन्मळून पडलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या त्यांना चुकवत निघालो. गांधरी पुलावरून पाणी गेल्याने त्यावर मोठे खड्डे पडलेले त्यातून मार्ग काढीत महाड शहरात प्रवेश केला. महिकावतीच्या मंदिराकडून मोहल्ल्यातून जाणार रास्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. त्यामुळे दस्तुरी नाक्याकडून गाडी काढली पुराचं पाणी ओसरलं होतं, पण सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्यावर आणि ज्यांची घरं पाण्याखाली होती त्यांच्या घरातही चिखल दिसत होता. समोरच एक ट्रक उभा होता तेथे लोकांची मोठी रांग लागलेली होती. त्यातून शासनाकडून आलेल्या चटई व इतर साहित्याचे वाटप सुरू होते. तेथे समोरच आत्येभाऊ अतुल चित्रे आपल्या सोसायटीबाहेर चिखल साफ करताना दिसला. त्याच्या जवळ थांबलो त्याने सांगितले की, 2005 मध्ये पहिल्या मजल्यावर माझ्या घरात 2 फूट पाणी होते. त्यामुळे पाणी भरायला सुरुवात झाल्यावर टीव्ही व इतर वस्तू उचलून  वरती ठेवल्या, पण यावेळी सीलिंगपर्यंत पाणी आल्याने होते-नव्हते ते सगळेच गेले, काहीच राहिले नाही. त्याच्या डोळ्यातील अश्रूच सगळं सांगत होते. त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ शासनातर्फे आलेली मदत गोळा करणे आणि त्यासंबधीची  कामे सुरू असल्याने वाहनांची गर्दी होती. रस्त्यावर सगळीकडे चिखल आणि रहिवाशांच्या घरातील भिजलेले धान्य, कपडे, गाद्या व लाकडी फर्निचर पडलेले होते. छ. शिवाजी महाराज चौकातून पुढे गेल्यावर सगळीकडे नागरिक घरातील चिखल बाहेर काढताना, तर काही जण भांडी व इतर वस्तू साफ करत असल्याचे दृश्य दिसत होते. वीज नाही, पाणी नाही आता घर कसे धुवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. अनेक ठिकाणी मदतीसाठी आलेले स्वयंसेवक, तसेच पनवेल, नवी मुंबई व इतर महापालिकांनी पाठवलेले सफाई कर्मचारी रस्ते साफ करताना दिसत होते. पावसाने वाहून आलेल्या कार व दुचाकी कचर्‍याच्या ढिगार्‍यात, लाईटच्या खांबाला किंवा एखाद्या झाडाला अडकून पडलेल्या दिसत होत्या. एका ठिकाणी तर मोटरसायकलवर कार अडकलेली होती. महाड एसटी आगारात भिजलेल्या अनेक गाड्या उभ्या होत्या. नेहमी गजबलेल्या स्थानकात आज चिखलाचे साम्राज्य आणि तेथील शांतता भीषण परिस्थितीची जाणीव करून देत होती. महाड पोलादापूर तालुक्यात सरकारी पातळीवर, स्वयंसेवी संस्था, आध्यात्मिक संस्था मदत करत आहेत.  अनेक लोक वैयक्तिक मदत करत आहेत, पंरतु नियोजन नसल्यामुळे अनेक गरजवंतांना मदत मिळत नाही. रस्त्यावरच्या घरांमध्ये मदत पोहचते. वाहन जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी मदत पोहचत नाही. त्यासाठी मदतीचे योग्य  नियोजन व्हायला हवे. अनेक ठिकाणी ज्यांचे नुकसान झाले त्यांच्याऐवजी दुसरेच आलेली मदत घेताना दिसत होते. मदत वाटायला कोणी आल्यास ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांच्याच घरातील 4-5 जण रांगेत उभे राहून मदत घेत असल्याचेही दिसून आले. पाण्याच्या बाटल्या घेऊन गाड्या आल्यावर ही ठराविक माणसेच पुन्हा पुन्हा येऊन बॉक्स घेऊन जात होती. अनेक सोसायटीमध्ये राहणार्‍या मध्यमवर्गीयांचे पूर्ण नुकसान होऊनही त्यांच्यापर्यंत मदत पोहचतच नाही. अनेकांच्या घरात धान्य नाही. अंगावर घालायला किवा अंथरायलाही कपडे नाहीत. झोपायचे कसे हाही प्रश्न आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे तर हाल बघवतच नाहीत. या दोन  तालुक्यांतील गावागावांत मदत पोहचली असल्याचे दिसून आले, पण आमच्याकडे मदत मिळाली नाही असे खोटे फोन करून ओळखीच्या लोकांना मदत पाठवायला सांगत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकर मदत करण्याचे आवाहन करतात. आशा एखाद्या गावात गेल्यावर गावाबाहेर तरुणांचे टोळके उभे असते.  तुम्ही चौकशी केल्यावर आमच्या गावात खूप नुकसान झाले आहे. आम्हाला मदत मिळाली नाही, असे सांगतात. फोन लावून आणखी काही तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बोलावले जाते. मग यांची 4 घरे, त्यांची 5 घरे असा हिशेब करीत 25-26 घरांचा हिशेब दिला जातो. प्रत्यक्ष  बोलण्यात गुंतवून याला द्या, त्याला द्या करीत 40-50 एक किट घेतली जातात. आमच्या बाबतीतही असेच घडले.पोलादपूर तालुक्यातील एका गावात मदत वाटल्यानंतर पाणी किती आले होते हे पाहताना एका घरात पाण्याचे बॉक्स जमा करून ठेवलेले दिसले. त्या घराच्या अंगणातही पाणी आले नव्हते. पनवेल येथून भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शानाखाली स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांची टीम रोज जेवण पुरवण्याचे काम करीत आहे. भाजप आणि संघाचे कार्यकर्ते शिस्तबद्ध पध्दतीने आलेल्या मदतीचे वाटप करीत आहेत. महाडमध्ये सर्वच ठिकाणी चिखल झाला आहे. तो साफ करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. साफसफाई करत असताना कित्येकाना काचा, लोखंडी पत्रे लागून दुखापत होत आहे, बरेच दिवस पाण्यात काम केल्यामुळे पाय कुजू लागले आहेत. शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे आजार उद्भवू लागले आहेत आणि ह्या सर्वांसाठी त्यांना औषधे आणि डॉक्टर ह्यांचीही खूप जास्त गरज आहे. अनेक संस्था धान्य देत आहेत, पण त्यांच्या घरातले सगळेच गेले आहे, पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही, लाईट नाही, घरात सगळीकडे चिखल, कुबट वास येत असताना ते अन्न शिजवणार कसे हा प्रश्न आहे. मदत सगळीकडून येत आहे, पण असं लक्षात येतंय की लग्नाच्या आहेरात आलेल्या पाच-सहा मिल्क कूकर किंवा लेमन सेटसारखी त्याची पुनरावृत्ती होत आहे. त्याऐवजी जमीन साफ करण्यासाठी फिनेल आणि डेटॉल, पुसण्यासाठी फडके आणि पायपुसणी या अत्यंत गरजेच्या वस्तू आहेत. भांडी साफ करण्यासाठी भांड्यांचा साबण आणि घासणी, हात धुण्यासाठी साबण,   आणि सॅनिटायझर, पाण्यात राहिल्यामुळे अनेकांच्या पायाला चिखल्या झाल्या आहेत त्यासाठीचं मलम किंवा व्हॅसलीन. त्याशिवाय किरकोळ सर्दीसाठी विक्स, किरकोळ अंगदुखीसाठी आयोडेक्स वगैरे देणे गरजेचे आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply