Breaking News

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची 30 एप्रिलला निवडणूक

पनवेल : वार्ताहर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एपीएमसीच्या एकूण 18 जागांसाठी येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असणार्‍या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल, उरण तालुक्यांबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले कृषी उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या ही बाजार समिती मध्यंतरी वेगवेगळ्या कारणांमुळे गाजली. या ठिकाणी बेकायदेशीर गाळ्यांचे बांधकाम करून त्यांची विक्री करण्यात आली. याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून चौकशी लावण्यात आली.
दरम्यान, या बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. 5 एप्रिल रोजी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल असून 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे, त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
सत्ता टिकवण्याचे शेकापसमोर आव्हान
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यंतरी घडलेल्या घडामोडींनंतर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निर्विवाद वर्चस्व प्राप्त करण्याचे मोठे आव्हान शेकापसमोर असणार आहे. शेकापची आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. वरिष्ठ पुढार्‍यांनी विचारधारा आणि ध्येय धोरणांना हरताळ फासल्याने अनेक जण पक्षाला सोडून गेलेले आहेत. त्यातच ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा प्रभाव आहे. त्यामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कमळ फुलवण्याची संधी भाजपला आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply