शहरातील वाहतुकीस अडथळा; नागरिकांमध्ये नाराजी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शहरात वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून ती वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई केले जाते, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाशी ते कोपरी गाव पामबीच मार्गावर अवैध पार्किंगचा प्रश्न बिकट झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. बेलापूर ते दिघा प्रत्येक विभागात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. पार्किंग जागांपेक्षा वाहने उदंड असे चित्र शहरात सर्वत्र आहे. वाहतूक विभागामार्फत बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जाते, परंतु त्यांनाही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. सिडकोकडून पालिकेला पार्किंगसाठी मिळणारे भूखंड अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शहरात पार्किंगबाबत ठोस उपाययोजना होत नाहीत, असे पालिकेचे म्हणणे आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. नवी मुंबई शहर नियोजनबद्ध शहर असले तरी पार्किंगच्या नियोजनाबाबत उदासिनता आहे. पालिकेने पार्किंग प्लाझा तयार करावेत व सिडकोकडून पार्किंगसाठीचे भूखंड मिळवावेत एवढीच अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.