Monday , January 30 2023
Breaking News

बीसीटी विधी महाविद्यालयातर्फे कायदा तुमच्या दारी विषयावर वेबीनार

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाचा विधी विभाग, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, विधी विभाग आणि बीसीटी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2021-22 अंतर्गत; ‘लॉ अ‍ॅट युवर डोअर स्टेप’(कायदा तुमच्या दारी) या 1 ते 4 ऑगस्ट अशा सलग चार दिवसांच्या वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्हार्‍डी, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी, विधी शाखेचे प्रमुख डॉ. रंजन कुमार आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने ऑनलाइन पध्दतीने, झुम मिटींगच्या माध्यमातून हे वेबीनार झाले.

पहिल्या दिवशी सर्वोच्च न्यायालाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी या वेबीनारचे उद्घाटन केले. डॉ. राजेश्री वर्होडी यांनी त्यांचे स्वागत केले, तर डॉ. रंजन कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी मुख्य अतिथी यांची माहिती दिली तसेच या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर श्रीकृष्ण यांनी कायदा आणि समाज या विषयावर विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.   

दुसर्‍या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. उदय वावीकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. तिसर्‍या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील अ‍ॅड. मृणालिनी देशमुख यांनी घरगुती हिंसाचार कायदा आणि महिलांचे सशक्तीकरण या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. शेवटच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील तथा महाराष्ट्र आणि गोवाचे विधीज्ञ परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. सुदीप पासबोला यांचे विधीज्ञ परिषदेचे अनुशासनात्मक अधिकार आणि जनकल्याण या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी प्रत्येक व्यक्त्याने प्रश्न-उत्तरे सदरात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

या कार्यक्रमाकरीता तसेच न्यायाधीश, वकील, प्राध्यापक, आजी माजी विद्यार्थी अशा अनेक जणांनी झूम मीटिंगवर प्रत्यक्ष तर युट्यूब लाईव्हवर अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला. मुंबई विद्यापीठाचे सहा. प्रा. डॉ. संजय जाधव, डॉ. अलका पाटील यांनी तसेच बीसीटी विधी महाविद्यालयाचे सहा. प्रा. संघप्रीया शेर, प्रा. कृपा नाईक, प्रा. प्रियांका उंडे, प्रा. निनाद शेंडगे, प्रा. भाग्यश्री पाटील, ग्रंथपाल हिटेश छत्तानी तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुयश बारटक्के आणि समृध्दी तिवटणे यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली.

चार दिवस चाललेल्या या वेबीनारमध्ये बीसीटी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या वेबीनार मध्ये सहभागी होणार्‍यास, प्रत्येक दिवशीच्या उपस्थितीबाबत सहभागाचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले.

‘लॉ अ‍ॅट युवर डोअर स्टेप’ या मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने सुरू केलेल्या उपक्रमासाठी प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी डॉ. राजेश्री वर्होडी यांचे तसेच वेबीनारमध्ये मार्गदर्शन करणारे सर्व व्याख्याते आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांचे विशेष आभार मानले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply