Breaking News

नेरळकरांच्या अंगणात मोरांचा नाच

मागील काही वर्षात नेरळकरांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे दररोज दर्शन होत आहे. दररोज सकाळ-सायंकाळ मोरांचे मंजूळ स्वर कानावर पडत असताना आपल्या जीवाला कोणताही धोका नाही याची खात्री झाल्याने हे मोर लोकवस्तीत येऊन मुक्त संचार करीत आहेत. इमारतींच्या माध्यमातून काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने मोडोशी भागातील असंख्य मोरांनी स्थलांतरण केले आहे. दरम्यान, नागरीकरणामुळे शेकडो मोरांनी बेकरे गावाच्या हद्दीत आपले वास्तव्य हलवले असून बेकरे ग्रामस्थ कोणत्याही मोराची शिकार होऊ नये याची काळजी वर्षभर घेत असून त्यांच्या होत असलेल्या संवर्धनाबाबत कौतुक होत आहे. पूर्वी पावसाळ्यात जंगल भागात मोर आपले दर्शन द्यायचे. 15 वर्षांपूर्वी हा एक दुर्मिळ क्षण असायचा, मात्र कर्जत-नेरळ रेल्वे पट्ट्यात पाली-भुतिवली धरणाची निर्मिती झाली आणि त्या भागात सर्वात पहिल्यांदा मोर दिसून यायला लागले होते. केवळ पावसाळ्याच्या दिवसात हे मोर पाली भुतिवलीपासून माथेरानच्या जंगल भाग अशी मुक्त सैर या मोरांकडून असायची. माथेरान येथून नेरळला येत असलेल्या मिनिट्रेनमधून प्रवास करणार्‍या पर्यटक आणि प्रवाशांना मोर जुम्मापट्टी भागात दर्शन द्यायचे. हे वगळता मोर हा पक्षी तसा पूर्वी कर्जत तालुक्याला दुर्मिळच असायचा. पावसाची सर आली की मोराचा फुलता पिसारा पाहण्यासाठी यापूर्वी हक्काची जागा असायची ती म्हणजे पक्षीसंग्रहालय, पण नेरळ, डिकसळ आणि जुम्मापट्टी परिसरात एक तासभर शांत बसून राहिले की अनेक मोर पावसाळ्यात पिसारा फुलवून आनंद देऊ शकतात. त्या काळात पक्षीप्रेमींना किमान मोरांचे मंजूळ स्वर कानी पडण्याचे आणि ते मंजूळ स्वर आपला थकवा, शीण घालण्यास पुरेसे असायचे. गेल्या काही वर्षात नेरळ फॉरेस्ट टेकडी पासून माणगाव टेकडी आणि पंचवटी भागात, तसेच बेकरे गावाच्या पाठीमागे मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. माणगाववाडी आणि जुम्मापट्टी स्टेशनच्या खाली असलेल्या जंगलात असंख्य मोर दिसतात. त्यांना स्थानिक लोकांनी दिलेले प्रेम यामुळे हे मोर तेथे लोकवस्तीत येऊन मुक्तसंचार करीत आहेत. कर्जत-नेरळ रस्त्यावर डिकसळपासून नेरळ जकात नाक्यापर्यंत मोरांचे दर्शन सहज होत असते.हुतात्मा चौकाच्या मागे असलेल्या मोडोशी भागात 20 वर्षांपूर्वी प्रचंड जंगल होते आणि तेथील बांबूच्या बनात असंख्य मोर मंजूळ स्वरांनी नेरळकरांना आनंद द्यायचे, पण तेथे मागील 7-8वर्षात काँक्रीटचे जंगल वाढू लागल्याने तेथील मोरांनी आपले वास्तव्य फॉरेस्ट टेकडीवर हलवले आहे.तेथील शाळेच्या आवारात आणि कधी कधी महामार्गाच्या जवळ या मोरांचे दर्शन सायंकाळी खात्रीने होत होते. एलएईएस शाळेच्या आवारात येथील विद्यार्थ्यांना हे मोर आपला पिसारा फुलवून आनंद देत असल्याचे विद्यार्थी अनुभवत असतात. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी जंगल भागात मोर दिसतात का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मोरांच्या या दर्शनाने नेरळकर निसर्गप्रेमी सुखावले आहेत. या सर्व मोरांचा मुक्काम नेरळ भागात कायम राहावा म्हणून वन विभागाने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी पक्षीप्रेमी यांनी केली होती. आता नेरळच्या टेपआळी, मोडकनगर, भितारआळी, हेटकरआळी आणि चिंचआळी भागातील लोकांची सकाळ हे मोर यांच्या मंजूळ स्वरांनी करीत असतात. या भागातील या अनेक इमारतींच्या टेरेस वर दररोज आपली उपस्थिती लावणारे हे मोर आता नेरळ गावातील अनेकांचे दररोजचे पाहुणे बनले आहेत. तर सायंकाळी हमखासपणे मोरांचे मंजूळ स्वर आणि झाडावर आपला पिसारा सांभाळत बसलेले मोर पाहण्यासाठी नेरळच्या जकात नाक्यावर गेल्यास खात्रीने दिसून येतात. तेथील फॉरेस्ट टेकडीवर हे मोर निलगिरीच्या झाडांवर मोठ्या संख्येने आढळून येत असतात, तर काही बैठ्या घरांच्या अंगणात हे मोर मुक्तसंचार करीत असल्याचा अनुभव नेरळकर घेत आहेत. त्यात नेरळकर पर्यावरण आणि पक्षीप्रेमी असल्याने कोणत्याही मोरांच्या जीवाला धोका नाही याची जाणीव झाल्याने हे मोर नेरळकरांच्या अंगणात घरातील पाळीव पाण्याप्रमाणे मुक्तसंचार करीत असतात. त्यात टेपआळी आणि भितारआळी येथील टेकडीला लागून असलेल्या घरांना मोरांनी आपले हक्काचे ठिकाण बनवले आहे. नेरळ येथून कर्जतकडे जाताना लागणार्‍या पंचवटी भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य मोर पावसाळ्यात दिसून येतात. केवळ रस्त्याने जाताना नाही तर मुंबईकडे जाणार्‍या लोकलमधून प्रवास करताना देखील पंचवटी भागात लोकल प्रवाशांना मोर आपले दर्शन देत असतात. तेथील एका मंगल कार्यालय असलेल्या लॉन वर आणि झाडांवर हे मोर मुक्तसंचार करीत असतात. त्या वेळी त्यांना पाहण्यासाठी सांयकाळी असंख्य पक्षीप्रेमी बसून राहताना दिसतात तर कर्जत-कल्याण राज्य मार्ग रस्त्याने प्रवास करणार्‍या वाहनचालक आणि त्या गाडीतून प्रवास करणार्‍या लोकांनी माणगाव टेकडीकडे न्याहाळले तरी पाच मिनिटांच्या प्रवासात मोर दिसून येतात. पावसाळ्यात हे मोर नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल भागात स्थलांतर करून राहत असल्याचे सिद्ध झाले आहे. पाऊस असेल तर हे मोर आपल्या मंजूळ स्वरांनी लोकांना आनंद देण्याचे काम करतात. त्यामुळे नेरळ परिसरात अनेक ठिकाणी मोरांचे दर्शन होत असल्याने त्यांना पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. नेरळच्या मोडोशी जंगलात किंवा फॉरेस्ट टेकडी येथे उन्हाळ्यात पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने मोर जानेवारी महिना सुरू झाला की आपले वास्तव्य हलवतात. पावसाळा संपला की येथे पाणी मिळेनासे झाले की हे मोर आपला मुक्काम बेकरे गावाच्या परिसरात हलवतात हे मागील काही वर्षात स्पष्ट झाले आहे. चार पाच वर्षात बेकरे गावच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यात साचून राहणारे पाणी आणि तेथील डोंगरात कायम पाणी आढळून येत असल्याने मोरांनी आपला मुक्काम त्या भागात हलवला आहे. पहिल्या वर्षी मोरांना मारायला काही शिकारी यायचे, परंतु बेकरे ग्रामस्थ यांनी त्या शिकारीसाठी येणार्‍या लोकांना हाकलून लावल्याने मोरांच्या हत्या थांबल्या. त्यात बेकरे ग्रामस्थ जागरूक असल्याने आता एकाही मोराची हत्या होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सकाळच्या वेळी बेकरे गावाच्या मागे किमान 50 मोरांचे थवे पक्षीप्रेमींना अनुभवता येतात. त्यामुळे मोरांचे संवर्धन करण्यात बेकरे गाव आघाडीवर असून तेथील प्रत्येक जण मोरांच्या प्रेमात आहे. त्यामुळे त्या मोरांना संरक्षण मिळाले असून आता मोरांच्या हत्या थांबल्या आहेत, असे बेकरे गावाच्या आजूबाजूला असलेल्या मोरांची संख्या पाहिल्यावर बोलता येईल.

पाण्याची व्यवस्था

अखेर वनविभागाने महाबळेश्वर येथील वनतलावाच्या धर्तीवर जंगलात बशीच्या आकाराचे लहान पाणी साठवून ठेवणारे भांडे बनविले जाणार आहेत. त्या बशीत पाणी घालण्याचे काम करण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन समितीची मदत घेतली जाणार आहे. मोरांबरोबर अन्य पक्षांना देखील त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. दरम्यान, या मोरांचे पाण्यासाठी स्थलांतरण होऊ नये म्हणून वनविभागाने या मोरांचे वास्तव्य उन्हाळ्यात देखील राहावे म्हणून एक प्लॅन तयार केला आहे. नेरळ भागातील जंगल भागात मोरांचे वास्तव्य वाढण्यास महत्त्वाचे कारण हे जंगल सांभाळून वाढविल्यामुळे शक्य झाले आहे.त्यामुळे हा ठेवा कायम जतन करण्यासाठी वनविभाग त्या पक्षांसाठी पाण्याची सोय जंगलात करणार आहे.

-संतोष पेरणे

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply