दुबई ः वृत्तसंस्था
मॅथ्यू वेड (17 चेंडूंत नाबाद 41) आणि मार्कस स्टॉइनिस (31 चेंडूंत नाबाद 40) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला आणि दुसर्यांदा ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत गाठले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (49) आणि मिचेल मार्श (28) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले, मात्र लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (5) आणि ग्लेन मॅक्सवेल (7) या चौकडीला बाद करीत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले, पण स्टॉइनिस आणि वेड यांनी 81 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याआधी पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 अशी धावसंख्या उभारली. होती. मोहम्मद रिझवान (67) आणि फखर झमानने (नाबाद 55) अर्धशतक झळकावले.
…अन् सामना फिरला
177 धावांचा पाठलाग करणार्या ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या दोन षटकांमध्ये 22 धावांची गरज होती. 19व्या षटकात मॅथ्यू वेडने लगावलेल्या एका फटक्यावर हसन अलीने झेल सोडला आणि पुढील तीन चेंडूंवर वेडने शाहीन आफ्रिदीला षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. हा सुटलेला झेल सामन्यातील टर्निंग पॉईंट होता.