
कळंबोली : बातमीदार
पनवेल परिसरात पर्यावरणाचा समतोल चांगला राहावा सुंदर पनवेल हिरवेगार पनवेल राहण्यासाठी पनवेलच्या विविध भागात सप्तपर्णी झाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.
सप्तपर्णी झाड हे बहुगुणी व आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची असणार्या वृक्ष आहे. झाडाला प्रत्येक फांदीला सात पाने असल्यामुळे झाडाला नाव सप्तपर्णी असे दिले गेले असल्याचे पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी सांगतात. बहुतांशी या झाडाला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दिवसांमध्ये मनमोहक आणि सुबक गोलाकार पांढरी शुभ्र अशी फुले बहरतात. संपूर्ण झाडच फुलांनी भरून गेल्यावर मोरपंख फुलल्यासारखे या वृक्षाचा डोलारा मनमोहक असा दिसतो. हा वृक्ष फुलांनी बहरल्यावर मनमोहक दिसतो तितका त्या फुलांमधून दरवळणारा सुगंध ही पनवेलकरांना मनमोहित करीत आहे.
सप्तपर्णी ही वनस्पती सातवीण, सातवण, इंडियन डेविल ट्री, डिटा बँक ट्री, मिल्कवूड पाईन ट्री, व्हाईट चेस वूड, छितवन, सालवीण आदी नावाने ओळखली जाते. या वनस्पतीस इंडियन सिंकोना असेही म्हणतात. पश्चिम बंगालचा हा राज्यवृक्ष आहे.भारतात ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीची बागबगीचे, रस्त्याच्या कडेला मुद्दामहून लागवड केलेली आढळते. ही वनस्पती 30-35 फूट उंच वाढते. या सदाहरित वनस्पतीस पावसाळा संपल्यावर फुले येतात. फुले सुवासिक, गुच्छात येतात. पाने संयुक्त असतात. पाने तोडल्यास त्यातून चीक येतो. पाने आकाराने मोठी, लांबट, सावरी सारखी शक्यतो एका देठास सात पाने येतात.काहीना कमीजास्तही असतात. या वनस्पतीची फळे (शेंगा) वीतभर लांबीची, चवळीच्या शेंगासारखी असतात. मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत परिपक्व होतात. बी आकाराने चपटे, पांढरे धागे असलेले असते.
औषधी गुणधर्मांने ही वनस्पती त्रिदोषघ्न, वातशामक, मृदुरेचन, कुष्ठघ्न, ज्वरघ्न, कृमिघ्न, स्तन्यजनन, रक्तशोधक, व्रणशोधक आहे. ही वनस्पती त्वचाविकार, श्वासरोग, कास, रक्तविकार, मलेरिया, दंतकृमी, व्रण, अल्सर, सांधेदुखी, हगवण, जंत यावर फारच उपयुक्त आहे. या वनस्पतीच्या सालीचा व पानांचा उपयोग परंपरागत औषधात केला जातो. या वनस्पतीची साल तापावर खूपच गुणकारी आहे. पचननलिकेच्या आजारातही साल वापरली जाते.सप्तपर्णीच्या पानाने जखमा लवकर भरून येतात. जुनाट व्रण, दातदुखी, सांधेदुखी यावर वनस्पतीची साल खूपच उपयुक्त आहे.
अल्सर या विकारात या वनस्पतीचा चीक वापरतात. या वनस्पतीने आमाशयाची शक्ती वाढते. जीर्ण अतिसार व आव यात या वनस्पतीचा काढा देतात. जीर्ण आमवातात सुजलेल्या सांध्यावर या वनस्पतीच्या सालीचा लेप खूपच उपयुक्त आहे. ज्वरांत किंवा बाळंतपणात येणार्या थकव्यावर सप्तपर्णी उपयुक्त पडते. त्वचाविकारात या वनस्पतीची साल उपयोगी आहे. सप्तपर्णी या वनस्पतीने पोटातील कृमीचा नाश होतो, अशी माहिती वनौषधी, योग, पंचकर्म, निसर्गोपचार तज्ञ सुधीर नामदेव पाटील यांनी दिली आहे. अशा या बहुगुणी आणि पनवेलच्या सौदर्ययात भर टाकणार्या वनस्पतीची लागवड सर्वत्र करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper