Breaking News

नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर; स्वच्छ सर्वेक्षण 2022साठी महापालिका सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

’स्वच्छ सर्वेक्षण 2021’मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा संकल्प ठेवून नवी मुंबई महानगरपालिका या सर्वेक्षणाला सामोरी गेली आहे. अद्याप या सर्वेक्षणाचा निकाल लागला नसला तरी पहिला क्रमांक मिळवणे व तो कायम राखणे, हे ध्येय पालिकेसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका स्वच्छतेचा जागर करीत स्वच्छ सर्वेक्षण 2022साठी सज्ज होत आहे, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जाहीर केले आहे. नुकतेच महापालिका मुख्यालयात आयोजित स्वच्छतेचे पुढचे पाऊल या कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या निर्माण होणार्‍या कचर्‍याची समस्या अनेक देशांपुढे आहे. केवळ इच्छ़ा म्हणून आपण देशातील सर्वात स्वच्छ शहर होणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलेले नाही तर आपल्या शहरामध्ये ती क्षमता आहे. यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील आहेच, मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहभागाशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातील दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका व घरगुती घातक अशा प्रकारे वेगवेगळा करावा. त्यासाठी वेगवेगळे डबे ठेवावेत व महानगरपालिकेच्या स्वच्छतामित्रांकडे तो कचरा वेगवेगळा द्यावा. केवळ एवढेच केले तरी स्वच्छतेचे 90 टक्के उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास आयुक्तांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे. कचरा वर्गीकरण ही सर्वांत महत्त्वाची बाब असून ज्या सोसायट्या वर्गीकरण केलेला कचरा देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलला जाणार नाही, हे ठरलेलेच आहे. त्यामुळे वर्गीकरण केलेला कचराच दिला पाहिजे आणि कारवाई करण्याची वेळच येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच, नागरिकांनी वेगवेगळा दिलेला कचरा स्वच्छता मित्रांकडून वेगवेगळाच ठेवला जावा, याबाबत अधिक सतर्कता बाळगली जाणार आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी व त्या निवारणासाठी कार्यरत असणारी तक्रार निवारण प्रणाली ही अधिक प्रभावी केली जाणार आहे. स्वच्छता ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाची सवय व्हावी, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना स्वच्छ सर्वेक्षण 2021मधील काही उल्लेखनीय उपक्रमांची व्याप्ती वाढविली जाणार आहे. यामध्ये झोपडपट्टी भागातील कचर्‍याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणारे ’झीरो वेस्ट स्लम मॉडेल’ सर्वच झोपडपट्टी भागांत राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ’झीरो वेस्ट’ची ही संकल्पना गाव-गावठाण व सेक्टर भागातही राबविली जाणार आहे. नवी मुंबईकर नागरिक अत्यंत जागरूक असून त्या जागरूकतेचा उपयोग स्वच्छता कार्यात व्हावा, यादृष्टीने शहरातील काही रस्त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी ’रस्ते दत्तक योजना’ राबविण्याची अभिनव संकल्पना आयुक्तांनी जाहीर केली. या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा स्वच्छतेवर राहणारे लक्ष्य तो परिसर आणि शहर स्वच्छतेसाठी मोलाचा ठरणार आहे.

तीन टप्प्यांत होणार कार्यवाही सर्वसाधारणपणे 2 ऑक्टोबरपासून स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात होत असली तरी स्वच्छता ही सातत्यपूर्ण बाब असल्याने पालिकेने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा उत्तम दिवस निवडून स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी ते एप्रिल अशा तीन टप्प्यांत सर्वेक्षणाची उंचावत नेणारी कार्यवाही केली जाणार आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply