उरण : प्रतिनिधी
माझी शेती, माझा सात बारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्प अंतर्गत मौजे कळंबुसरे येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग पार पडला. राज्य शासनाने नुकताच ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू केलेला आहे. त्यानुसार शेतकरी ई-पीक मोबाइल अॅपमधून स्वतः शेतात लावलेली पिके व फळबाग, सिंचन पद्धती, शेतातील झाडे, इत्यादी माहिती ई-पीक पाहणी अॅपमधून भरणार आहेत. यावरून गाव नमुना 12 मध्ये पिके अद्यावत केली जातील. या प्रकल्पामुळे शेतकरी आपल्या पिकाबाबत आत्मनिर्भर होत अशी अपेक्षा आहे. ग्रामस्तरावर प्रचार व प्रसिद्धचे काम राज्यभर सुरू असून उरण तालुक्यातील कळंबुसरे या गावात शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी गावाचे सरपंच नूतन नाईक, ग्रामसेविका स्वाती पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आदी ग्रामस्थ शेतकरी मंडळी उपस्थित होते. मोठी जुई सजेचे तलाठी शशिकांत सानप यांनी उपस्थितांना ई-पीक पाहणीमुळे शेतकर्यांना थेट शासकीय मदत, शेतमालाची आधारभूत किंमत, विकेल ते पिकेल योजना, नैसर्गिक आपत्तीचे नुकसानभरपाई, पिकाची अवस्था, पेरणी व पिकाखालील सिंचनक्षेत्र याबाबत प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचे मार्गदर्शन मिळाले.