कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज कोरोना मुळे लागलेल्या लॉक डाऊनमुळे गेली दोन वर्षे आर्थिक आधार शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.आदिवासी समाज आजही कंदमुळे,जंगलातील मेवा आणि पावसाळ्यात माळरानावर पिकवलेला भाजीपाला यांच्या रोजगारातून कुटुंबाची गुजराण करीत असतो.मात्र गेली दीड वर्षे त्यांना बाजारात आपल्याकडील कंदमुळे, भाजीपाला नेता येत नव्हता आणि त्यामुळे ग्राहकाला हव्या त्या किमतीत कमी दरात माल विकून हे आदिवासी शेतकरी दोनवेळचे अन्न कसे मिळेल हे पाहत असतात.दिवाळी सणाला प्रत्यकाचे घरी कंदमुळे यांचा नाष्टा पाहुण्यांना देण्याचा आणि घरच्यांनी त्यांचा आनंद घेण्याची प्रथा आहे.मात्र करांदे,रताळे, अडकुळे,कोमफळ यांची विक्ती या आदिवासी लोकांना बाजारात जाऊन करता आली नाही आणि त्यामुळे दिवाळी सण येऊन गेला हे या आदिवासी लोकांना कळले देखील नाही.
अशा दुर्गम भागात राहणारे आदिवासी शेतकरी यांचा गौरी गणपतीचा सण आनंदात घालविण्यासाठी त्यांनी पावसाळा सुरू झाला की आपल्या आजूबाजूला असलेल्या माळरानावर भाजीपाला शेती करून पिकवलेला भाजीपाला आर्थिक आधार देत असतो. पावसाळ्यात हे आदिवासी शेतकरी भाताची शेतीबरोबरच भाजीपाला शेती करतात.मोकळ्या माळरानावर भाजीपाला शेती करायची असल्याने त्या आदिवासी लोकांना भाताच्या शेतीची कामे करतानाच आपल्या भाजीपाला पिकासाठी माळरानावर वाफे तयार करावे लागतात.त्यावर भाजीपाला पीक हातात चांगल्या पद्धतीने यावे यासाठी मांडव बनवावे लागतात आणि त्याचवेळी मेहनत घेणारे आदिवासी लोक दरवर्षी माळरानावर शेती करतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.दरम्यान,50 हुन अधिक आदिवासी वाड्यांमधील शेतकरी भाजीपाला शेती करतात,ही शेती आता पूर्ण जोमाने फुलली असून भाजीपाल्याचे मळे फुलले असून बाजारात आदिवासींचा भाजीपाला ग्राहकांना आकर्षित करीत आहे.
कर्जत आणि मुरबाड तालुक्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागात राहणारे आदिवासी लोक पावसाळ्यात प्रामुख्याने भाजीपाला शेतीत करीत असतात.मे महिन्यापासून हे आदिवासी भाजीपाला पिकांची रोप तयार करतात. त्यासाठी त्यांना पाणी डोक्यावर हांडे भरून आणून रोपे जगवावी लागतात.त्याआधी उन्हाळ्यात त्या माळरानावरील जमीन ओली करून वाफे बनविण्याची मेहनत देखील शेतकर्यांना करावी लागत नाही.त्यामुळे या मेहनतीचा फायदा पावसाळ्यात झालेला दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणात माळरानावर भाजीपाला शेती केलेली दिसून येते. मात्र भेंडी, वांगे, काकडी, शिराळे, घोसाळे, दुधी भोपळा, डांगर, कारले, मिरची या प्रकरची भाजी पिकविणारे शेतकरी कर्जत तालुक्यात असून पावसाळ्यात भाजीपाला शेती करणारे शेतकरी यांना सर्वाधिक मेहनत ही मांडव उभे करण्यासाठी करावी लागते. त्यामुळे कितीही पाऊस कोसळत असला तरी भाजी ही चांगल्या दर्जाची उपलब्ध होत असते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ओलमण, नांदगाव, खांडस, पाथरज, मोग्रज, वारे, साळोख,कळंब, पाषाणे, बोरिवली सुगवे या ग्रामपंचायतमधील आदिवासी लोकांचे भाजीपाला मळे हे श्रावण महिना सुरू होत असताना फुललेले दिसून येत आहेत.
आपल्या कुटुंबाचा गाडा चालण्यासाठी केली जाणारी भाजीपाला शेती हा त्यातील डामशेवाडी, गोरेवाडी, झुगरेवाडी, कोतवालवाडी, वडाचीवाडी, चाफेवाडी, कातकरवाडी, ताडवाडी, मोरेवाडी, मार्गाची वाडी, चाफेवाडी, मेंगाळवाडी अशा अनेक वाड्यामधील आदिवासी लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु ह्या वर्षी कोविडमुळे मार्केटमध्ये व्यापारी अतिशय कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या माळरानावर पिकलेला मालाला मागणी मात्र अतिशय कमी आहे. त्यामुळे भाजीपाला मालाची किंमत अतिशय कमी स्वरूपात मिळत आहे. काकडीला पनवेल सारख्या मार्केटमध्ये किलोला एक रुपया एवढा भाव आहे,त्यामुळे शेतकरी, मोठ्या चिंतेत आहे. त्याचवेळी सर्व भाज्या अतिशय अल्प दराने विकल्या जात आहेत.भाज्या पिकवून बाजारात नेण्यासाठी येणारा खर्च हा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. त्यातच भाजीपाला करणारा हा शेतकरी रायगड जिल्ह्यातील टोकावर वसलेलं कर्जत तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गाव पाड्यातील आदिवासी ठाकूर आहे. पनवेल सारख्या बाजारात पोहचण्यासाठी होणारा खर्च भाज्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीत हे शेतकरी आहेत. त्यामुळे कोरोना तून सावरण्यासाठी भाजीपाला शेती आर्थिक आधार देण्याऐवजी शेतकऱयांना आर्थिक संकटात टाकत आहे. त्यामुळे दाजी गोरे,काशिनाथ गोरे, राम मेंगाळ, नवसु मेंगाळ, चंद्रकांत कांबडी, देहू कांबळी, जगदीश मेंगाळ, मारुती पारधी,दामू गोरे, लक्ष्मण मेंगाळ,राम खंडवी, आदी काही शेतकरी श्रावण महिना असूनही बाजारात आपल्या पिकांना भाव नसल्याने चिंतेत सापडला आहे.
पूर्वी हेच आदिवासी शेतकरी श्रावण महिन्यात केवडा पासून टाकळा, माठ, डेखणा या वस्तू देखील आपल्या भाजीपाला पिकासोबत बाजारात विक्री साठी न्यायचे.सोमवारी श्रावणी सोमवारचा उपवास सोडविण्यासाठी केळीची पाने आवश्यक असतात, ती पाने जंगलातून जाऊन आणून रेल्वेच्या माध्यमातून कल्याण, दादरपर्यंतच्या बाजारात नेली जायची. सर्वांना लोकल प्रवास सुरु झाला नसल्याने हे आदिवासी लोक लोकल प्रवास करून दादर पर्यन्त पोहचत नाहीत. ही व्यथा केवळ कर्जत तालुक्यातील आदिवासी शेतकर्यांची नाहीतर तर मेन लाईन वरील कर्जत, खोपोली पासून बदलापूर पर्यंतच्या भागातील आदिवासी शेतकर्यांची आहे. दुसरीकडे श्रावण महिना हा आदिवासी लोकांच्या भाजीपाला व्यवसायातील महत्वाचा आर्थिक टप्पा असतो आणि त्याच वेळी लॉक डाऊन मुळे बंद झालेला लोकल प्रवास ही या आदिवासी लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीने मोठी समस्या बनली आहे. तर यापूर्वी हे आदिवासी लॉक करीत असलेली मेहनत पाहिली तर सामान्य लोक देखील आदिवासी लोकांच्या मेहनतीचे कौतुक करायचे. कारण दिवसभर जंगलातून आणलेल्या वस्तू हे आदिवासी कुटुंबातील महिला पहाटेची रेल्वे पकडण्यासाठी सायंकाळी सात वाजता जवळच्या रेल्वे स्थानकात पोहचतात आणि स्टेशन वर येऊन सोबत आणलेली भाकरी चटणी हे खाऊन झोपी जातात. स्टेशन वर पहाटे येणारी पहिली लोकल पकडून हे आदिवासी दादर कल्याणच्या बाजारात आपल्या कडील भाजीपाला विकून सकाळी घरी परततात आणि पुन्हा नेहमी प्रमाणे त्यांची कामे सुरू होतात.
भाजीपाला शेतीच्या माध्यमातून आपले कुटुंब चालविण्यासाठी कर्जत तालुक्यातील किमान 500 शेतकरी भाजीपाला शेती करून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.पण कल्याण, पनवेल सारखे बाजारात जाऊन योग्य मोबदला मिळत नसल्याने आता स्थानिक बाजारात हे आदिवासी लोक भाजीपाला विकण्यास बसू लागले आहेत. आपल्या भागातून जाणार्या राज्यमार्गावर हे आदिवासी लोक आपल्या आदिवासी वाडीच्या बाहेर टोपलीमध्ये भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसत आहेत. प्रामुख्याने कर्जत-मुरबाड रस्त्यावर प्रत्येक गावाच्या बाहेर आदिवासी लोकांनी पिकवलेला भाजीपाला मिळू लागला आहे.त्यात कर्जत सारख्या पर्यटन अधिक असलेल्या तालुक्यात शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर या आदिवासी लोकांकडून पिकवलेला भाजीपाला घेण्यासाठी आलिशान वाहने रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसून येतात. त्या आलिशान वाहनांमधील ग्राहक हे ताजा आणि रासायनिक खतांची मात्रा नसलेला भाजीपाला खरेदी करण्यावर भर देत असल्याने कर्जत तालुक्यातील या आदिवासी शेतकर्यांना काहीसे बरे दिवस असल्याचे हे शेतकरी बोलून दाखवतात. मात्र त्यावेळी कल्याण, पनवेलच्या बाजारात नेण्यासाठी पिकवलेल्या भाजीपाल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहक नसल्याने नुकसान देखील या आदिवासी शेतकर्यांना सोसावे लागत आहे.त्यामुळे या शेती करण्यासाठी झालेला खर्च यातील मुद्दल उभी करण्याचा प्रयत्न सुरू असून शेतकरी हिरवागार फ्रेश स्थानिक भाजीपाला बाजारात घेऊन येऊ लागल्याने ग्राहक खुश दिसत आहे.
-संतोष पेरणे, खबरबात