Breaking News

सरकार स्थिर… मिरचीचे दर स्थिर

पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागली की बेगमीची तयारी सुरू होते. लग्नाची तयारी घरात सुरू झाली की आधी चर्चा होते ती मिरची पावडर म्हणजे मसाल्याची. त्यात बाजारात रेडिमेड मिरची पावडर आणि मसाले असले तरी खरी पसंती असते ती बाजारात मिरच्या खरेदी करून तयार केल्या जाणार्‍या मसाल्यांची. मग महिलावर्ग आपल्या पसंतीच्या ठिकाणी मिरची खरेदी करण्यापासून त्या घरी आणून सुकवून ठेवणे, मसाले तयार करण्यासाठी लागणारे गरम मसाल्याचे पदार्थ यांची जमवाजमव कारण्यापर्यंत सर्व कामे महिलावर्ग आवडीने करीत असतो. त्यातही घरात लग्नकार्य असेल तर मग महिला आवडीने पाहुण्यांना आवडतील असे मसाले तयार करण्यावर भर देत असतात आणि त्यातून शोधाशोध सुरू होते ती चांगली मिरची शोधण्याची. मग मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या महिलांच्या आवडीची बाजारपेठ असते ती कर्जत, नेरळ किंवा चौकची.   

मुंबईपासून पुण्यापर्यंत पट्ट्यातील खवय्ये असलेल्यांना कर्जत, नेरळ आणि चौकची विविध प्रकारची मिरची उपलब्ध असलेली बाजारपेठ खुणावत असते. हैदराबादची स्पेशल मिरची मिळणारी एकमेव बाजारपेठ गृहिणींच्या गर्दीने फुलली आहे. महागाईच्या जमान्यात दुकाने कमी झाली असली तरी आवक मात्र तेवढीच आहे. त्यामुळे मिरचीचा ठसका जेवणाच्या मसाल्यात हवा तर कर्जतची मिरची गल्लीत जायलाच हवे.चौक ही आणखी एक मोठी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात घाऊक मालाची दुकाने आहेत. त्यातही आणखी चॉईस हवा असेल तर मग नेरळ या बाजारपेठेलादेखील पसंती मिळताना दिसते, मात्र यावर्षी किंवा मागील दोन वर्षाच्या मिरची व्यवसायातील बाजारपेठेचा विचार करता दरवाढ न झालेली ही बाजारपेठ समजली जात आहे. त्याची अनेक कारणे असतील, पण देशातील स्थिर सरकार हेदेखील प्रमुख कारण असल्याचे व्यापारी मान्य करतात. मसाल्याचे पदार्थ हे पूर्वी साठवून ठेवले जायचे आणि त्यातून दरवाढ ठरविली जायची. पण हवामानामुळे मिळालेली साथ यामुळे दक्षिणेतील राज्यात पिकविली जाणारी मिरची ही तेथील शेतकर्‍यांना चांगला भाव मिळवून देणारी ठरत असल्याने मिरची पिकविणारा शेतकरी खूश आहे आणि त्यामुळे लागोपाठ दोन वर्षे भाववाढ झालेली नाही. असा व्यवसाय हा केवळ मिरची व्यवसाय आहे. 

जानेवारी-फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणार्‍या वस्तूंची साठवण करण्याचे. घरच्या सुगरण असलेल्या महिला मंडळीला लवकरात लवकर तिखट मसाला करण्याचे वेध लागले आहेत.  जेवणातील महत्त्वाचा घटक भाजी आणि भाजीसाठी लागणारा मसाला महिला स्वत: जातीने लक्ष देऊन बनवून घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीसाठी कर्जतची बाजारपेठ ओळखली जाते. महाराष्ट्रातील मिरचीची सर्वांत मोठी बाजारपेठ समजल्या जाणार्‍या कर्जतच्या बाजारपेठेत विकली जाणारी मिरची ही प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून येते. कर्जतच्या मिरची गल्लीत जेवणात तिखट मसाल्याचे विशेष आकर्षण असलेले खवय्ये प्रामुख्याने मिरची खरेदीसाठी येतात. बदलापूर, डोंबिवली, कल्याण, पनवेल, ठाणे, नवी मुंबई या भागातील आगरी-कोळी लोक मच्छी-मटण या पदार्थांची लज्जत वाढविणारे मसाले बनविण्यासाठी कर्जतच्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या खरेदी करण्यासाठी जानेवारीपासून गर्दी करतात.

मिरचीसोबत मसाल्याचे पदार्थ त्यात हळद, गरम मसाले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.

पूर्वी कर्जत बाजारपेठेत मिरची विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. त्यामानाने मिरचीची विक्री करणारी दुकाने कमी झाली आहेत, मात्र जी दुकाने आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. कर्जतच्या मिरची गल्लीत शंकेश्वरी, गंटूर, लवंगी, अंकुर, काश्मिरी, ढोबळी, तेलपरी, बेडगी या जातीची मिरची विक्रीसाठी येते. महागाई आणि किरकोळ वाढलेले भाव याचा कोणताही परिणाम कर्जतच्या या प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेवर पडला नाही.कारण चार महिन्यांच्या मिरची हंगामात तब्बल 500-600 पोते मिरचीची विक्री होते. कोकणातील मांसाहारी मंडळी ही प्रामुख्याने गंटूर आणि लवंगी या मिरचीला सर्वाधिक प्राधान्य देतात. कारण या दोन्ही प्रकारच्या मिरचीची चव तिखट असते. हीच स्थिती चौक आणि नेरळमधील घाऊक व्यवसाय करणार्‍या बाजारपेठेत व्यापार्‍यांची बनली आहे. मिरची ही नाशवंत असल्याने जास्त माल खरेदी करून चालत नाही. त्यामुळे दर आठवड्याला मिरची पोती भरून येत असते. सर्व ठिकाणी व्यापारी हे 150-200 पोती एवढा माल आणून व्यवसाय करतात आणि पुन्हा पुढील आठवड्याचे नियोजन करतात. त्यात चवीने तिखट असलेली लवंगी मिरची आणि रंगाने लालभडकपणा दाखविणारी बेडगी मिरची यांना अधिक मागणी असल्याने या मालाची अधिक आवक तिन्ही बाजारांत दिसून येते.

मिरची ही सर्व व्यापार्‍यांना वाशी किंवा पुणे येथील बाजारातून येत असते. तीन महिने उन्हळ्यात हा सीझन असला तरी यावर्षी भाववाढ नसल्याने गिर्‍हाईक खूश आहे. बाजारात महिला मिरची आणि मसाला बनविण्यासाठी लागणार्‍या गरम मसाल्यांच्या खरेदीसाठी गर्दी करून असतात. बाजारात रेडिमेड मिरची पावडर मिळत असते. 

मसाल्याचे विविध 21 पदार्थ यांचे मिश्रण कमी प्रमाणात असल्याने महिलावर्ग मोठ्या शुभकार्यासाठी मसाले बनवून घेण्यास पसंती देत असतात. त्यात गरम मसाल्याचे किलोचे दर पाहिले तर रेडिमेड मिरची पावडर ही कशी बनविली जाते याचे उत्तर महिलांना लगेच मिळते. कारण गरम मसाल्याचे पदार्थ हे किलोला साधारण 700-800 रुपये असून तयार मसाला बाजारात 200 रुपये किलोने मिळत असतो. त्यावेळी 100 पासून 250पर्यंत दराने प्रतिकिलो मिरची खरेदी करून मसाले बनविले की ते चवदार होतात. हे कोणालाही पटण्यासारखे असल्याने आणि घरातील जेवणात किंवा सार्वजनिक कार्यात चांगले रुचकर जेवण देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल यात शंका नाही, पण देशातील स्थिर सरकार हेदेखील मिरचीचे आणि मसाल्याच्या पदार्थाचे दर स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.

कसा करतात मसाला?

खरेदी केलेल्या मिरचीची सुकलेली देठ काढून मिरची कडक उन्हात सुकवली जाते. त्यानंतर त्यात हळद, गरम मसाले यांचे योग्य मिश्रण करून या सर्व वस्तू मिरची कांडपमध्ये मसाला तयार करण्यासाठी नेल्या जातात. तेथे कांडप गिरणीत तयार झालेला मसाला गृहिणी या डबे भरून ठेवतात. हा मसाला वर्षभर टिकतो, तर बाजारात मिळणारे तिखट मसाल्याच्या पाकिटात केवळ मिरची पूड असते. त्यामुळे मिरची खरेदी करून मसाला करण्याची धडपड खवय्ये करीत असतात.

कर्जतच्या बाजारपेठेत मिरचीच्या चवीची खात्री ग्राहकांना मिळत असल्याने आणि कोणताही गिर्‍हाईक तक्रार घेऊन येत नसल्याने दरवर्षी जुनी गिर्‍हाईके कायम राहून नवीन गिर्‍हाईकांची भर पडलेली दिसून येते.हेच आमच्या कर्जतच्या सर्व व्यापार्‍यांचे दोन पिढ्यांच्या सचोटीचे यश आहे.

-जयंतीलाल जोहारमल परमार, मिरचीचे जुने विक्रेते

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आता पक्षवाढीसाठी …

Leave a Reply