पनवेल : बातमीदार
दोन दिवसांपासून दारूविक्री करणारी दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. संचारबंदी, जमावबंदी असताना खारघरमधील गावांमध्ये सुरू असलेल्या दारूविक्रीला जोर आला आहे. इतर ठिकाणी दारू मिळत नसल्यामुळे गावांमध्ये चढ्या दराने दारूविक्री केली जात आहे. सिडकोने विकसित केलेल्या खारघर झोनमध्ये पूर्वीपासून दारूबंदी असल्यामुळे खारघर शहरात दारूविक्री करणारे एकही दुकान नाही. महामार्गापासून काही मीटर अंतरावर दारूविक्री करता येणार नाही, असा नियम आल्यानंतर खारघरमध्ये दोन परमिट रूम वगळता कुठेही दारूविक्री सुरू करता आली नाही. दारूविक्री करणार्या व्यावसायिकांनी स्थानिक व्यावसायिकांना घेऊन दारूविक्रीचा परवाना मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे खारघर नोडमध्ये येणार्या गावांमध्ये छुप्या पद्धतीने बेकायदा दारूविक्री केली जाते. मुर्बी, रांजणपाडा आणि कोपरा ही गावे यामध्ये आघाडीवर आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून विविध उपाययोजना सुरू आहेत. जमावबंदी, संचारबंदी केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सोयीसुविधा सुरू आहेत. तरीही खारघरमधील तळीराम मद्य प्राशन करण्यासाठी बेलापूर किंवा कळंबोली, कामोठ्याचा मार्ग धरतात.
बेकायदा पद्धतीने दारूविक्री केली जात असेल, तर ही गोष्ट गंभीर आहे. हा प्रकार चुकीचा असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
-संजयकुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई