Breaking News

पहिल्या वनडेत भारताचा पराभव

 द. आफ्रिकेची विजयी सलामी; आज दुसरी लढत

पर्ल ः वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर 31 धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. शिखर धवन (84 चेंडूंत 79 धावा), विराट कोहली (51) आणि शार्दूल ठाकूर (नाबाद 50) या तिघांनी अर्धशतके झळकावूनही मधल्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला फटका बसला.

सामनावीर रासी व्हॅन डर दुसेन (96 चेंडूंत नाबाद 129 धावा) आणि कर्णधार तेम्बा बव्हुमा (143 चेंडूंत 110) या शतकवीरांनी रचलेल्या द्विशतकीय भागीदारीच्या बळावर आफ्रिकेने 4 बाद 296 अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर भारताला 50 षटकांत 8 बाद 265 धावांत रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले. या विजयासह आफ्रिकेने तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. उभय संघांतील दुसरा सामना शुक्रवारी (दि. 21) खेळवण्यात येईल.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने कर्णधार के. एल. राहुलला (12) स्वस्तात गमावले, पण धवन-कोहली यांच्या अनुभवी जोडीने दुसर्‍या गड्यासाठी 92 धावांची भर घालून भारताला नियंत्रण मिळवून दिले. धवनने 34वे, तर कोहलीने 63वे अर्धशतक साकारले. धवन व कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (17), ऋषभ पंत (16) आणि व्यंकटेश अय्यर (7) हे तिघे अनुक्रमे 34 ते 36 षटकांच्या दरम्यान माघारी परतल्यामुळे भारताचा डाव 1 बाद 138 वरून 6 बाद 188 असा घसरला. शार्दूलने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावून जसप्रीत बुमरासह नवव्या गड्यासाठी 51 धावांची भर घातली, मात्र तोपर्यंत भारताचा पराभव पक्का झाला होता.

तत्पूर्वी, 3 बाद 68 धावांवरून बव्हुमा आणि दुसेन यांनी दोघांनीही कारकीर्दीतील दुसरे शतक साकारताना दुसर्‍या गड्यासाठी 183 चेंडूंतच 204 धावांची भागीदारी रचली. आफ्रिकेसाठी भारताविरुद्ध कोणत्याही गड्यासाठी रचण्यात आलेली ही दुसर्‍या क्रमांकाची भागीदारी ठरली. बुमराने 49व्या षटकात बव्हुमाला बाद करून ही जोडी फोडली, परंतु कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवणार्‍या दुसेनने अखेपर्यंत नाबाद राहून नऊ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली आणि आफ्रिकेला 300 धावांच्या जवळ नेले.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply