मुंबई ः प्रतिनिधी
‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या हंगामाच्या लिलावात इतिहास रचला आहे. तो पीकेएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला यूपी योद्धाने 1.65 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले. पीकेएलच्या लिलावाच्या दुसर्या दिवशी ए श्रेणीतील खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आणि प्रदीप नरवालचे नाव समोर येताच तेलुगू टायटन्सने प्रथम त्याच्यासाठी 1.20 कोटींची बोली लावली. त्यानंतर अनेक संघांनी प्रदीपला खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले, पण यूपी योद्धाने अधिक बोली सुरू ठेवली आणि प्रदीपला त्याच्या संघात समाविष्ट केले. यापूर्वी यूपी संघाने नितेश कुमार आणि सुमित या खेळाडूंनाही कायम ठेवले होते. प्रदीपव्यतिरिक्त यूपीने एफबीएम कार्डद्वारे श्रीकांत जाधवला आपल्या संघात समाविष्ट केले. तीन वेळा माजी चॅम्पियन पाटणा पायरेट्सला एफबीएम कार्डचा वापर करून पुन्हा एकदा प्रदीप नरवालला संघाल सहभागी करून करण्याची संधी होती, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे प्रदीप प्रथमच यूपी योद्धा संघाचा एक भाग बनला.
‘डुबकी किंग’ ते ‘प्रो-कबड्डीचा मेस्सी’
प्रो कबड्डीच्या इतिहासात प्रदीप नरवालचा विक्रम जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळेच पाटणा पायरेट्सने तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामात विजेतेपद पटकावले. प्रदीपने पीकेएलच्या इतिहासात 1160 रेड पॉइंट्स मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. याशिवाय त्याने जास्तीत जास्त 59 सुपर 10 गुण मिळवले आहेत. प्रदीपने एकाच वेळी दोन स्वतंत्र प्रसंगी एका सामन्यात 30पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. असा हा पराक्रम त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूने केलेला नाही. प्रदीप आतापर्यंत पीकेएलमध्ये बंगळुरू बुल्स आणि पाटणा पायरेट्सकडून खेळला आहे. सामन्यात चढाई करताना ‘डुबकी’ हा डाव खेळण्यात प्रदीप तरबेज मानला जातो. त्यामुळे त्याला ‘डुबकी किंग’ अशी ओळख मिळाली आहे. आता त्याच्यावर सर्वाधिक बोली लागल्याने तो ‘प्रो-कबड्डीचा मेस्सी’ बनला आहे.
लिलावातील अव्वल पाच खेळाडू
प्रदीप नरवाल (यूपी योद्धा) 1.65 कोटी
सिद्धार्थ देसाई (तेलुगू टायटन्स) 1.30 कोटी
मनजीत (तमिळ थलायव्हाज) 92 लाख
सचिन (पाटणा पायरेट्स) 84 लाख
रोहित (हरयाणा स्टीलर्स) 83 लाख