Breaking News

एफएमसीजीच्या कंपन्यांना मागणी का वाढते आहे?

शेअर बाजार तापला की गुंतवणूकदार सुरक्षित क्षेत्र शोधायला सुरुवात करतात. जीवनावश्यक वस्तू विकणार्‍या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना म्हणूनच गेल्या काही दिवसांत मागणी वाढली आहे. अशा काही कंपन्यांना कायम मागणी राहणार असल्याने त्या कंपन्यांकडे आपले लक्ष असले पाहिजे.

मागील दोन वर्षे आपण सर्वांनीच लॉकडाऊनचा अनुभव घेतलेला आहेच. ज्याप्रमाणं लॉकडाऊनमुळं अनेकांना समस्या निर्माण झाल्या त्याप्रमाणं काही क्षेत्रांना याचा फायदादेखील झाला. उदा. आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केल्यामुळं त्यांचे बरेचशे ओव्हरहेड्स कमी व्हायला मदत झाली. लॉकडाऊनमध्ये मनोरंजनात्मक उपक्रमांपासून वंचित राहिल्यानं, मित्रांच्या अड्ड्यांना मुकावं लागल्यानं आणि अगदी संध्याकाळी पाय मोकळे करणंदेखील दुरापास्त झाल्यानं सर्वांच्याच मोकळीकतेवर एक प्रकारे अंकुश आणि नकळत लोकांच्या आनंदावर विरजण पडलं. बाहेर असणार्‍या इन्फेक्शनच्या धास्तीमुळं घरात अडकलेल्यांना अगदी घरपोच विविध रुचकर अशा रेसिपीस पोहचवण्यासाठी झोमॅटो आणि स्विगी या कंपन्या सरसावल्या. काँटॅक्टलेस डिलिव्हरी, नो मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू, यु कॅन ऑर्डर एनीव्हेअर फ्रॉम 15 किमी, अशा प्रकारच्या जाहिरातींमुळं अधिक लोक ऑनलाइन खाणं-जेवण ऑर्डर करण्याच्या कल्पनेशी सुसंगत झाले आणि यात सर्वांत पुढाकार होता कॉर्पोरेट्स आणि मिलेनियल्स यांचा. सध्या तर हा ट्रेंडच बनून गेलेला दिसतो. याचा झोमॅटो व स्विगीवाल्यांना फायदा झाला. कोविडच्या काळानंतर झोमॅटोचा महसूल दुप्पट झाला तर स्विगीबद्दलचा अहवाल सांगतो की सुमारे पाच लाख 54 हजार ऑर्डर्स केवळ चिकन बिर्याणीच्या नोंदवल्या गेल्या.

ऑनलाइन पुरवठ्याची स्पर्धा

अशीच दुसरी गोष्ट फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्सची. इंटरनेटच्या सहज व सर्रास वापरामुळं फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स या उद्योगक्षेत्रात बदल होऊ लागले आहेत. आता उत्पादनाच्या वैशिष्ट्यांची तुलना केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या वेळेनुसार ऑर्डर करण्याची मुभा मिळते. त्यामुळंच तर बाजारातील विश्लेषक या क्षेत्राकडून आशा बाळगून आहेत. सध्या सुमारे 15 दशलक्ष व्यवहार करणारे वापरकर्ते असलेल्या या सेगमेंटचा ग्राहकांचा आकडा 80 दशलक्षपर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे. ऑर्डर देण्याची वारंवारतादेखील सुमारे पाच वेळा प्रतिमाह जाण्याची अपेक्षा आहे. सध्या जवळपास 110-120 दशलक्ष भारतीय ऑनलाइन खरेदी करतात असं अहवाल सांगतो. सध्या आपण अनुभवलंच असेल की फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे ऑनलाइन पोर्टल व त्यांची डिलिव्हरी करणार्‍या कंपन्यादेखील आता ग्रोसरी व स्टॅपल्स यांचादेखील व्यवसाय करू लागले आहेत. त्यातच रिलायन्स रिटेल, सुपरडेली ह्या ऑनलाइन चेन्स आहेतच आणि त्यातच या क्षेत्रातील संधी हेरून टाटांनी बिग-बास्केटमधील बहुतांशी हिस्सा खरेदी करून या व्यवसायात पदार्पण करत या स्पर्धेमध्ये उडी घेतलेली आहे.

भारतीय हवामान खात्याने सप्टेंबरच्या पावसाचा सरासरीपेक्षा अधिक अंदाज वर्तवल्यानंतर ग्रामीण क्षेत्रातून उपभोग आणि पर्यायानं मागणी वाढण्याच्या आशेनं एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यात वाढ झाली व बीएसई एफएमसीजी निर्देशांकदेखील विक्रमी उच्चांकावर पोहचले. एफएमसीजी म्हणजे फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स. फास्ट मूव्हिंग असं म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांची शेल्फ लाईफ कमी असते, म्हणजेच त्यांची विक्री होईपर्यंत दुकानांमध्ये या वस्तू पडून राहण्याचा कालावधी तुलनेनं कमी असतो (उदा. 15 दिवस ते 6 महिने इ.) दुकानांत पडून राहण्याचा कालावधी कमी असणं म्हणजे त्यांचा खपदेखील जास्त असणं.

किंमती कमी पण वापर जास्त

ग्राहकांच्या सततच्या मागणीमुळं (उदा. शीतपेयं, तयार खाद्य पदार्थ, मिठाई, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, इ.) एफएमसीजीचे आयुष्य कमी असते किंवा या गोष्टी नाशवंत वस्तू (उदा. मांस, दुग्धजन्य पदार्थ, तळलेले पदार्थ इ.) असतात ज्यांची वारंवार खरेदी केली जाते किंवा असा माल शीघ्रपणे वापरला जातो. या वस्तूंच्या किंमती  कमी असतात आणि त्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. अशा गोष्टींची स्टोअरमध्ये शेल्फवरील उलाढाल जास्त असते. जरी या उत्पादनांच्या किंमती कमी असल्या आणि त्यामधील नफ्याचे मार्जिन्स कमी असले तरी एकूण ग्राहकोपयोगी गरजांचा सुमारे 50 टक्के हिस्सा या प्रकारच्या वस्तूंचा असतो आणि अर्थातच त्यावरील खर्चदेखील वारेमाप असू शकतो.

एफएमसीजीचे मार्केटिंग

आपल्या आजूबाजूस लक्ष दिल्यास हे आढळून येईल की आजकाल यापैकी बहुतांशी गोष्टी या मोठ्या कंपन्यांद्वारे सादर केल्या जात आहेत (ब्रँडेड), ज्या गेल्या काही वर्षांपर्यंत नॉन-ब्रँडेड होत्या, म्हणजेच त्या खरेदी करताना आपणांस ब्रँड व्हॅल्यूचा आग्रह नसायचा. उदा. गवळ्याकडील दूध सर्रास घेतलं जायचं, परंतु आता त्याची टक्केवारी कमी होते आहे. दूध पुरवणार्‍यांमध्ये चितळे, अमूल इत्यादी ब्रँड आहेतच, परंतु आता विविध अ‍ॅप्सद्वारे अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. अगदी लहान मुलांच्या कपड्यांपासून ते सध्या मास्कपर्यंत ब्रँडेड वस्तूंची सवय लावली गेलीय. जर तुम्ही मॉल्समध्ये निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की नवीन लाँच केले गेलेले एफएमसीजी प्रॉडक्ट्स हे प्रवेशद्वाराच्या समोरच आकर्षकरित्या मांडलेले असतात. त्यामुळं अगदी गरज नसताना त्यांची खरेदी केली जाते आणि एफएमसीजी कंपन्यांच्या प्रयत्नांना यश मिळतं. अजून एक गोष्ट म्हणजे मॉल्समधील एस्कलेटर्स हे एकावर एक कधीच नसतात तर ते विरुद्ध दिशेस असतात जेणेकरून एका बाजूकडून दुसर्‍या बाजूस जाताना आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक गोष्टी नेटकेपणानं मांडलेल्या असतात आणि त्यांची खरेदी केली जाते. अनेक अशा गोष्टीं पाहून आपल्या खरेदीच्या यादींमधील नसलेल्या गोष्टींचीदेखील आपल्याला आठवण करून दिली जाते. तर असं हे एफएमसीजी क्षेत्र आणि त्यांचं अचाट असं मार्केटिंग.

बोटावर मोजता येईल एवढ्याच कंपन्या

या क्षेत्रात बोटावर मोजल्या जातील इतक्याच कंपन्या ठाण मांडून आहेत. दंतमंजनाच्या प्रॉडक्ट्समधील पूर्वापार माहीत असलेले विश्वसनीय नाव म्हणजे, कोलगेट तर सकाळी उठल्यावर शरीर स्वच्छतेपासून ते रात्री झोपताना लावण्यात येणार्‍या मॉस्किटो रिपेलंट्सपर्यंत दर्जेदार नवनवीन वस्तू पुरवणारी हिंदुस्तान युनीलिव्हर, बिस्कीट व बेकरी प्रॉडक्टसमधील अव्वल ब्रिटानिया, इन्स्टंट कॉफी व नूडल्ससाठी नंबर 1 असलेली नेस्ले इंडिया, अगदी सिगरेटपासून तयार अन्नपदार्थ व तयार कपड्यांच्या क्षेत्रातील आयटीसी, आरोग्यासंबंधीत आपला खयाल रखनेवाली डाबर तर ठराविक पण उच्च दर्जाच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेली गोदरेज आणि या आधी केवळ मिठासाठी प्रसिद्ध असलेली परंतु आता या सर्व कंपन्यांच्या तुलनेत स्टॅपल्स क्षेत्रात नवीन आलेली टाटा कंझ्युमर प्रॉडक्टस यांखेरीज जिलेट इंडिया, ज्योती लॅब्स, इ. कंपन्या या क्षेत्रात आपले पाय रोवून आहेत ज्यांचे शेअर्स बाजारात नोंदणी झालेले आहेत. याव्यतिरिक्त भांडवली बाजारात येऊ घातलेली पतंजलिदेखील याच क्षेत्रातील आहे. त्यांच्या नफ्याचा फायदा आपणदेखील का घेऊ नये?

सुपरशेअर – टायटन कंपनी

मागील आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं 17340 तर बाँबे स्टॉक एक्स्चेंच्या सेन्सेक्सनं 58194 हे आतापर्यंतचे सर्वोच्च उच्चांक नोंदवले तर ज्वेलरी व वैयक्तिक लाइफस्टाईल जोपासणार्‍या टायटन कंपनीच्या शेअर्सनी नवा उच्चांक गाठला (रु.2024). या आठवड्यातच हा शेअर सुमारे 11 टक्क्यांनी वधारला व या आठवड्याचा सुपरशेअर ठरला. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सी. के. वेंकटरमण यांच्या म्हणण्यानुसार कोविडनंतर स्टडेड दागिन्यांपेक्षा सोन्याच्या दागिन्यांमुळं कंपनीस अधिक फायदा झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी आता निमशहरं व ग्रामीण भागांमध्ये व्यवसाय-विस्तार करण्यास जास्त लक्ष घालणार आहे. कंपनीचे सीएफओ अशोक सोंथालिया यांनी सांगितल्यानुसार, कंपनी सोन्याच्या हॉलमार्किंगकरिता तयार आहे आणि हॉलमार्किंग युनिक आयडीसारख्या नवीन बदलामुळं जरी कंपनीसमोर काही आव्हानं असतील तरी यातून कंपनीस फायदा होऊ शकतो. आता येऊ घातलेला सणासुदीचा काळ आणि कोविड – 2 नंतरच्या अनलॉकिंगनंतर लोकांच्या खिशातून बाहेर डोकावणारा पैसा, या गोष्टी दागिने खरेदीकडं दुर्लक्ष कसं होऊ देतील?

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply