मुंबई ः प्रतिनिधी
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी राजकीय पक्ष तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात कोकण, औरंगाबाद व नागपूर शिक्षक, तर नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित असणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त तैनात असेल. नाशिक पदवीधर मतदारसंघात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी एका जागेसाठी 23 उमेदवार राजकीय नशीब आजमावित आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवारांमध्ये लढत आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात आठ उमेदवार आहेत, तर औरंगाबादमध्ये 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी साधारणपणे सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होणार आहे, तर मतमोजणी 2 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल.