पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षक दिन, पालक सभा व नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार असा संयुक्त त्रिवेणी समारंभ येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला. शिक्षक दिनाच्या पूर्व दिनी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी आणि समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संयुक्त समारंभात शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच माई भोईर व उपसरपंच विजय घरत व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालकसभा आयोजित करण्यात आली. पालकांच्या संमतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याची संमती घेण्यात आली. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. उपसरपंच विजय घरत यांनी सत्काराला उत्तर देताना ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच पालकांनी या पालक सभेला भरघोस प्रतिसाद देऊन शाळा करून सुरू करण्याविषयी सकारात्मकता प्रदर्शित केल्याबद्दल पालकांचे कौतुक केले. गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येत असल्याबद्दल सरपंच माई भोईर व उपसरपंच विजय घरत यांचेही आभार मानले. या वेळी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, कोपर गाव भाजपचे अध्यक्ष सुधीर ठाकूर आदी पालक व शिक्षक उपस्थित होते. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख जोत्स्ना ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले तर पर्यवेक्षक दी पक भर्णुके यांनी आभार मानले.