Breaking News

जेएनपीटीच्या व्यापारवृद्धीमुळे राज्याच्या विकासदरात वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

उरण : जिमाका

शासनाच्या दळणवळण सुविधा विकासाच्या धोरणांमुळे जेएनपीटी हे आता देशातीलच नव्हे, तर जगातील अग्रगण्य बंदर म्हणून नावारूपाला येत आहे. त्याचा फायदा जलवाहतूक व व्यापारवृद्धीला होत आहे. जेएनपीटीच्या या सातत्याने होत असलेल्या व्यापारवृद्धीमुळे विकासदरात वाढ होण्याचा फायदा राज्याला होत असतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जासई (ता. उरण) येथे केले. जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांच्या 12.5 टक्के योजनेमध्ये विकसित करण्यात आलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे अनावरण रविवारी (दि. 17) ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते व  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.जेएनपीटीच्या सेझ साईट मैदानावर झालेल्या या भव्य सोहळ्याला केंद्रीय जहाजबांधणी, रस्ते वाहतूक, महामार्ग जलवाहतूक, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, भरत गोगावले, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष नीरज बन्सल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, विश्वस्त महेश बालदी, विवेक देशपांडे, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, अतुल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, शिल्पकार दिनकर धोपटे, इतिहासतज्ज्ञ व स्मारक संकल्पनाकार पांडुरंग बलकवडे आदी उपस्थित होते.सर्वप्रथम दास्तान फाटा येथे प्रकल्पग्रस्तांच्या 12.5 टक्के योजनेमध्ये साकारण्यात आलेले शिव-समर्थ स्मारकाचे अनावरण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी स्मारक व तेथील प्रदर्शनाची पाहणी केली. या ठिकाणी स्मारकासह बगीचा व एकूण 9000 वर्गमीटर एकूण जागेचा विकास करण्यात आला आहे.यानंतर सभास्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जेएनपीटी मुंबई नॅव्हिगेशन चॅनेलच्या खोलीत वाढ करून 12500पेक्षा अधिक टीईयू क्षमतेच्या नवीन जहाज हाताळणीसाठी सज्ज झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले; तर जेएनपीटी सेझ येथे मुक्त व्यापार वेअर हाऊस क्षेत्र विकासकामाचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुलवामा दुर्घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.आपल्या भाषणात ना. फडणवीस म्हणाले की, शिव-समर्थ स्मारकामुळे भक्ती आणि शक्तीचे एकत्रिकरण झाले आहे. अस्मिता निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अध्यात्माची जोड होती म्हणून त्यांनी पराक्रम घडवला. शिव-समर्थ स्मारकात देदीप्यमान इतिहासाची मांडणी करण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. ना. नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जेएनपीटीच्या विकासामुळे व्यापारवृद्धी होत असून, त्याचा फायदा हा राज्याच्या सकल उत्पादनवाढीसही होत आहे. या ठिकाणी जगातील सर्वोत्तम कंपन्या काम करताहेत.  बंदर आणि रस्त्यांचे मोठे जाळे उभारून देशाचा वेगाने विकास होत आहे. भारतमाला व सागरमाला या दोन महत्त्वाकांक्षी योजनांची जबाबदारीही ना. गडकरी यांच्यावर आहे. जेएनपीटीने खरेदी केलेली मुंबई येथील एअर इंडिया इमारत महाराष्ट्र शासन घेणार असून, मुंबईतील मराठी माणसाचे वैभव म्हणून शासन या इमारतीचे जतन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नानासाहेब धर्माधिकारी व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या माणूस घडवण्याच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला उपस्थित श्रीसदस्यांची अलोट गर्दी पाहून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईहून येथे समुद्रमार्गे येताना तो सागर पाहिला आणि आता हा मानवी सागर पाहावयास मिळाला. त्यांच्या या वाक्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी केले. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सचिन धर्माधिकारी, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आदींनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले. या कार्यक्रमाला दासभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेएनपीटीच्या क्षमता विकासामुळे सव्वा लाख रोजगारनिर्मिती -ना. गडकरी

आपल्या भाषणात ना. नितीन गडकरी म्हणाले की, शिव-समर्थ स्मारकाचे अनावरण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणे हा रायगड जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस आहे. दासबोधाच्या आधारे नानासाहेबांनी लोकशिक्षणाचे कार्य केले. माझ्या विभागामार्फत शिव-समर्थ स्मारकाचे काम झाले ही मला समाधान देणारी बाब आहे. ते पुढे म्हणाले की, सागरमाला योजनेंतर्गत 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रात 114 प्रकल्प होत असून, त्यांची गुंतवणूक 2 लाख 35 हजार कोटी इतकी आहे. यातून येत्या दोन वर्षांत जेएनपीटीचा विकास होऊन एक ते सव्वा लाख तरुणांना काम मिळेल. या ठिकाणी उपलब्ध होणारी रोजगाराची संधी सर्वप्रथम कोकणच्या भूमिपुत्रांना दिली जाईल, असेही त्यांनी घोषित केले. कोकणचा विकास होण्यासाठी रो रो सेवा विकास, एअर बोट सुविधा, ठाणे ते विरार जलमार्ग असे विविध प्रकल्प कार्यान्वित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.या वेळी ना. गडकरी यांनी येत्या वर्षाच्या अखेरीपर्यंत तयार होऊ घातलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागली. त्या एका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लागवड अशा पद्धतीने संपूर्ण महामार्ग हिरवा करण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर वृक्षरोपण करण्यास योगदान देण्याचे मान्य केले व त्यासाठी शासनानेही सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply