मुरूड : पावसाची दमदार हजेरी मुळे मुरूड तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. मुरुडमध्ये आतापर्यंत 1286 मिमि पावसाची नोंद झाली असून या पावसाने शेतांत पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे भातपिकांच्या लावणीस सुरूवात झाली आहे. मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. शेतकर्यांनी यंदा सुर्वणा, रुपाली, कर्जत 2 व 5, 8 चिंटु साई, जया, तांबामैसुरी या वाणाची लागवड मोठया प्रमाणावर केली आहे. यंदा सुरुवातीपासूनच भातशेतीला अनुकूल पाऊस झाल्याने भाताच्या रोपांची योग्य प्रकारे वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी भातपिकांच्या लावणीला प्रारंभ झाल्याचे चित्र दिसत आहे.
विजेचा दाब वाढल्याने लाखोंचे नुकसान
मुरूड : वीजवितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे मुरुडमधील दरबार रोड परिसरातील नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. बुधवारी (दि. 10) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास या भागातील विजेचा दाब अचानक वाढल्याने विद्युत उपकरणे जळून ग्राहकांचे नुकसान झाले तर या भागातील आयडीबीआय बँकेचा एक स्टेपीलायझर, युपीएस सर्विस रूम, संगणक, पंखे आदींचे नुकसान झाल्याने बँकेचे व्यवहार काही काळाकरिता ठप्प झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खंडित व अनियमित दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार आम्ही वीजवितरण कंपनीच्या अधिकार्यांकडे केली होती. मात्र त्यांनी त्याची दखल न घेतल्याने आमच्या बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आयडीबीआय बँकेच्या कर्मचार्यांनी सांगितले. विजेचा दाब वाढल्याने समुद्र किनारी असलेल्या हॉटेल गुरुप्रसादमधील आठ बल्ब, फ्रिज, तीन पंखे, एक मोठा एलईडी टीव्ही, व अन्य इलेक्ट्रीक उपकरणांचे मोठे नुकसान झाले. वीज वितरण कंपनीच्या गैरकारभारामुळे विजेचा दाब वाढून आमचे नुकसान झाले असल्याने कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हॉटेलचे मालक दामोदर बैले यांनी केली आहे.
पेणमध्ये आज भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
पेण : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष पेण शहर शाखेच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) शहरातील रोहिदास नगर येथे नवीन मतदार नोंदणी तसेच भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ नगर परिषदेचे गटनेते अनिरूद्ध पाटील यांच्या हस्ते आणि महिला व बालकल्याण सभापती शहेनाज मुजावर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. नविन मतदार नोंदणीसाठी 18 ते 21 वयोगटातील युवकांनी फोटो, आधारकार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स यापैकी कुठलेही एक कागदपत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.