
पनवेल : रामप्रहर वृत्त
आधुनिकरणाच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आणि आयुष्य घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची कास धरून कार्यरत राहा, असा मौलिक सल्ला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) रिटघर येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ झाला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य राज पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच रमेश पाटील, वाकडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश पाटील, स्कूल कमिटीचे धर्माबुवा पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वासुदेव भोपी, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, शांताराम चौधरी, बळीराम भोपी, कृष्णा पाटील, विष्णू भगत, महादेव डुकरे, राजेश भोपी, सुनील शेळके, शत्रुघ्न उसाटकर, स्कूल कमिटी सदस्या वंदना भोपी, मुख्याध्यापिका भारती नाईक यांसह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. देश विकासात ज्येष्ठांचे मार्गदर्शन, तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे युवकांनी देशविकासासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असे सांगून वेळापत्रक आखून अभ्यास करा. स्वतःच्या पायावर उभे राहून कर्तृत्वाने खूप मोठे व्हा, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे.