मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणार्या अलिबागचा स्वच्छ समुद्र किनारा, कुलाबा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याचबरोबर आता किनार्यावर तोफ लावण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट बनविण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वच्छ व सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणार्या व रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराची सध्या मोकाट घोडे, भटके कुत्रे व मोकाट गुरे ही मोठी समस्या झाली आहे. या मोकाट जनावरांचा त्रास येथील स्थानिक जनतेला, तसेच पर्यटकांनादेखील सहन करावा लागत आहे. प्रामाणिक, प्रसंगी मालकाच्या जीवाचे रक्षण करताना स्वतःचा जीव धोक्यात घालणारा प्राणी म्हणजे कुत्रा. त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडे, पण सध्या अलिबाग शहरातील गल्लीबोळात कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रस्त्यावर एकाच वेळी 10 ते 15 कुत्री टोळीने फिरत असतात. दिवसा त्यांचे टोळीने फिरणे, उरात धडकी भरण्यास कारणीभूत ठरते, मग रात्री तर एकट्या-दुकट्याने प्रवास करणे अधिकच धोक्याचे ठरणार यात शंका नाही. हीच भीती सर्वत्र बोलून दाखवली जात आहे. रस्त्यावर किंवा गल्लीमध्ये टोळीने फिरणारे हे भटके कुत्रे अचानक वाहनचालक किंवा पादचारी यांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे बेसावध राहिल्यास त्यांच्याकडून जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता असते. या भटक्या कुत्र्यांनी आजपर्यंत कित्येक वृद्ध, लहान मुलांचे लचके तोडले आहेत. मर्यादित संख्येने फिरणार्या कुत्र्यांकडून हे हल्ले झाले आहेत, आता तर कुत्र्यांची संख्या सर्वत्रच वाढली आहे. त्यामुळे टोळीने फिरणारे हे कुत्रे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अशा टोळीने हल्ला केल्यास एखाद्याला प्राणास मुकावे लागेल, याचा विचार अलिबाग नगर परिषदेने केला पाहिजे. कुत्र्यांची ही वाढती संख्या मर्यादित करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरणं करणे काळाची गरज आहे. नगरपालिका प्रशासनाने यासाठी पुढाकार घेऊन या भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढण्यासाठी मोहीम राबवायला हवी.
उनाड गुरे : अलिबाग शहरात मोकाट गुरांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही गुरे रस्त्यात कुठेही ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीलाही अनेकदा अडथळा निर्माण होतो. अलिबाग शहरातील मुख्य रस्ता, बाजारपेठ, एसटी आगार आदी परिसरात 15 ते 20 गुरे झुंडीने फिरताना दिसतात. तर कधी रस्त्यावर विसावलेली दिसून येतात. पाऊस आणि दुपारच्या कडक उन्हात ती इमारतींच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये आसरा घेतात. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरांचे मालक गुरे सोडून देतात. त्यामुळे ही गुरे शहरात भटकत राहतात. विकासाकडे वाटचाल करणारी अलिबाग नगर परिषद मोकाट गुरांच्या प्रश्नावर सध्या हतबल झालेली दिसून येत आहे. या उनाड गुरांमुळे अनेक अपघात झाले आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन या मोकाट गुरांचा बंदोबस्त केला पाहिजे.
मोकाट घोडे : अलिबागचा स्वच्छ समुद्रकिनारा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. परंतु या समुद्रकिनार्यावर घोड्यांच्या लिदीमुळे पर्यटक येथे थांबत नाहीत. लिदीमुळे पर्यटकांच्या व नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शहरात फिरणार्या मोकाट घोड्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेकादा समुद्रकिनार्याच्या परिसरात या घोड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. शहरात अपघातही झाले आहेत. माकाट घोड्यांना लगाम घातला पाहिजे. त्याबाबतदेखील नरमाईचे धोरण अलिबाग नगरपालिका घेेते. अलिबागला आल्यावर घोडागाडीत बसून समुद्रकिनार्याची सफर करण्याचा आनंद पर्यटक घेतात. त्यामुळे अलिबागमधील टांगा व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला, हे खरं आहे, परंतु त्यासोबत काही समस्यांही निर्माण झाल्या आहेत. समुद्राकिनार्यावर पडणार्या घोड्यांच्या लिदीमुळे नागरिकांच्या व पर्यटकांच्या आरोग्याची समस्या उभी राहिली. घोड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ओहोटीच्या वेळी धंदा केल्यानंतर समुद्राला भरती आल्यावर घोडे मोकाट सोडून दिले जातात. त्यामुळे शहारात मोकाट घोड्यांची समस्या निर्माण झाली. अलिबाग शहरातील सर्व घोड्यांना नगर परिषदेने नोंदणी क्रमांक द्यावा, मालकाचा नाव पत्ता नोंद करून घ्यावा. एखादा घोडा मोकाट सापडला तर त्याची माहिती देऊन मालकाला त्याचा घोडा घेऊन जाण्यास सांगावे. समुद्रावर पसरणारी घोड्यांची लीद संकलित करण्याची जबाबदारी टांगेवाले व घोडवाल्यांवर सोपवावी. घोड्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठीही नगर परिषदेने पुढाकार घ्यावा. शहरातील घोड्यांना रॅबीज व टिटॅनसची लस द्यावी. रस्ते रुंदीकरण, सुशोभिकरण याचबरोबर शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठीदेखील अलिबाग नगर परिषदेने कठोर निर्णय घ्यायला हवेत.
-प्रकाश सोनवडेकर