Monday , February 6 2023

सुनील तटकरेंच्या वल्गना खोट्या; आमदार रविशेठ पाटील यांचा पलटवार

पेण : प्रतिनिधी
पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या वेळी भाषणात खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वल्गना या खोट्या असून अशा खोट्या वलग्नांना पेणमधील जनता कधीच भुलणार नाही असा टोला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार रविशेठ पाटील यांनी खासदार तटकरे यांना लगावला. पेण अर्बन बँक ज्यावेळी बुडीत निघाली त्यावेळी ते राज्याचे अर्थमंत्री होते. त्यावेळी ते बँकेचा प्रश्न सोडवू शकले नाहीत तर आत्ता काय सोडविणार असा सवाल या वेळी त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, काल राष्ट्रवादीच्या झालेल्या मेळाव्यादरम्यान भाजपमध्ये काही काळ कार्यरत असणार्‍या विकास म्हात्रे यांनीदेखील प्रवेश केला, मात्र विकास म्हात्रे कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ राहणारा माणूस नसून तो एक फिरता रंगमंच असून काही महिन्यातच तो दुसर्‍या पक्षात प्रवेश करेल. पेण मतदार संघातील भाजप आजही मजबूत स्थितीत असून जर राष्ट्रवादीची ताकद पेणमध्ये असती तर खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना पेणमध्ये 15 हजारांची आणि शहरामध्ये सात हजारांची आघाडी कशी मिळाली? सुनील तटकरे हे खासदार झाल्यापासून आजपर्यंत पेण तालुक्यासाठी किती खासदार निधी वापरला हे त्यांनी जाहीर करावे. मागील महिन्यात वडखळ विभागातील पाच सरपंचांचा प्रवेश करून घेतला, मात्र त्यांना दिलेली रोजगाराची आश्वासनेदेखील अजून पूर्ण केली नाहीत. याचा अनुभवदेखील त्यांना हळूहळू येत आहे. सन 2009च्यादरम्यान तटकरे विविध खात्याचे मंत्री होते. त्यावेळी स्वतः जलसंपदा मंत्री असूनही त्यांनी पेण खारेपाट विभागातील पाणी प्रश्न सोडविला नाही. याउलट त्यावेळचा बाळगंगा धरणातील भ्रष्टाचाराचा प्रकार हा आजही राज्यातील जनता विसरली नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांनी भाषणबाजी करून कितीही खोटी आश्वासने दिली किंवा कितीही भंपकबाजी केली तरी या भूलथापांना पेण विधानसभा मतदार संघातील जनता भुलणार नसून तटकरेंची अशी ही बनवाबनवी दीर्घकाळ टिकणारी नाही असेदेखील आमदार रविशेठ पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन स्पष्ट केले. पेण विधानसभेतील तळागाळातील भागाचा विकास फक्त आणि फक्त या मतदार संघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटीलच करू शकतात. रविशेठ पाटील आमदार झाल्यापासून या दोन वर्षात आमदार निधी पाच कोटी, डोंगरी विकास निधी तीन कोटी, शासकीय निधी दोन कोटी आणि कृषी बंधारे निधी तीन कोटी असे एकूण 13 कोटी रुपयांचा निधी आजपर्यंत आमदार रविशेठ पाटील यांनी जनतेच्या विकासासाठी वापरला असून यापुढेदेखील या मतदारसंघातील विविध भागासाठी अशा प्रकारचा निधी वापरला जाईल, असे या वेळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply