लिमा ः वृत्तसंस्था
कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 30 पदकांसह वर्चस्व प्राप्त केले. अनिश भानवाला, आदर्श सिंग आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताने अव्वलस्थान पटकाविले. महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात भारतानेच तिन्ही पदकांवर नाव कोरले. मानवी सोनीने (105) सुवर्ण, येशाया कॉन्ट्रॅक्टरने रौप्य (90) आणि हितासाने (76) कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात विनय प्रताप सिंग चंद्रावतने 120 गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले, तर सेहजप्रीत सिंग (114) आणि मयांक शोकीन (111) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले़ 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स मिश्र प्रकारात आयुषी पॉडर व ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी रौप्यपदक मिळवले. जेतेपदाच्या लढतीत आयुषी-ऐश्वर्य जोडीने 17 नेम साधले, तर जर्मनीच्या मॅक्स ब्राऊन आणि अॅना जॅनसीन जोडीने 31 नेम साधले. पात्रता फेरीत आयुषी-ऐश्वर्य यांनी 590 गुणांसह विश्वविक्रम साकारला. याचप्रमाणे सांघिक प्रकारात प्रसिद्धी महंत, निश्चल आणि आयुषी या त्रिकुटाने रौप्यपदक मिळवले. अंतिम फेरीत भारताने अमेरिकेकडून 43-47 अशी हार पत्करली.