Breaking News

भुयारी मार्गाच्या नावाने शिवसेनेत दुफळी

कर्जत शहरातील मध्य रेल्वेच्या भिसेगाव-डेक्कन जिमखाना कर्जत यांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वे बांधणार आहे. एमएमआरडीएने 15 कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा यासाठी 32 वर्षांपासून आंदोलन उभे करणारे अनंतकाका जोशी आणि संघर्ष समिती यांच्या मागणीमुळे कर्जत नगरपरिषदेकडून सर्वसाधारण सभेत भुयारी मार्गाला अनंतकाका जोशी भुयारी मार्ग असे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान, राजकीय रंग लागलेल्या या भुयारी मार्गाच्या नामकरणामध्ये कर्जत शिवसेनेत रंगलेले राजकारण भुयारी मार्ग नामकरणामुळे चर्चेत आले आहे. त्यात शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अन्य राजकीय पक्ष अनंतकाका जोशी यांच्या नावासाठी एकमत दाखवत असताना आमदारांचा भाचा मात्र जोशी यांच्या नावाला विरोध करीत आहे. त्यामुळे अनंत जोशी हे शिवसेनेचे होते हे त्यांना अमान्य आहे किंवा विरोधाचे राजकारण करायचे यासाठी विरोध केला जात आहे, परंतु त्यात शिवसेनेत दुफळी आहे हे स्पष्ट होत आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीतील भागाचा विकास वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहचला असताना शहराला देखणे स्वरूप यावे यासाठी विविध रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेने यापूर्वी कर्जत नगर परिषद हद्दीतील आमराई येथील नाट्यगृहास राम गणेश गडकरी यांचे नाव दिले आहे.तर काही दिवसांपूर्वी कर्जत नगर परिषद हद्दीत प्रवेश करताना मौजे मुद्रे येथे उभारण्यात येणार्‍या प्रवेशद्वारास महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. तर शहापूर-मुरबाड येथून कडाव-कर्जतकडे येणार्‍या ठिकाणच्या प्रवेशद्वारास महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. कोंडीवडे-कर्जत रस्त्याने कर्जतकडे येणार्‍या ठिकाणच्या तिसर्‍या प्रवेशद्वारास भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये उल्हास नदी संवर्धन प्रकल्पास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. कर्जत नगर परिषदेचे आमराई येथे क्रीडांगण बांधले जात आहे, त्या वास्तूला छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे नाव देण्याचा ठराव संभाजी महाराज यांच्या नावाबाबत उपोषण झाल्यानंतर नगर परिषदेकडून तसे आश्वासन देण्यात आले होते. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कर्जत शहरातील सर्वात मोठ्या 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला नाव देण्यासाठी कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती, सभेस नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यानंतर कर्जत नगर परिषदेस एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळालेल्या निधीबद्दल पालिकेच्या वतीने राज्य सरकारचे, तसेच मंत्री, खासदार, आमदार यांचे आणि हा निधी शहरासाठी मिळावा यासाठी पाठपुरावा करणारे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला, मात्र विषय पत्रिकेप्रमाणे शहरातील नियोजित विविध प्रकल्पांना महापुरुष, मान्यवर यांची नावे देण्याचा ठराव घेण्यात येणार होता. त्यातील एमएमआरडीएकडून 15 कोटींचा निधी मिळालेल्या कर्जत डेक्कन जिमखाना ते भिसेगाव या दरम्यान मध्य रेल्वेच्या लाईन खाली बनविण्यात येणार्‍या भुयारी मार्ग पुलाला नाव देण्यावरून पालिकेच्या बाहेर राजकारण रंगले होते, मात्र शेवटी 32 वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाचे जनक आणि त्यांचे स्वप्न पाहणारे, तसेच पूर्ण करणारे स्व. अनंतकाका जोशी यांचे नाव देण्याचा ठराव पालिकेत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी रंगलेले राजकारण शहराने अनुभवले आणि त्यानंतर पालिकेच्या एकमताने झालेल्या निर्णयाचे शहरात स्वागत होत आहे. या विशेष सभेला मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, गटनेते नितीन सावंत, विरोधी पक्षनेते शरद लाड, नगरसेवक भारती पालकर, सुवर्णा निलधे, विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, बळवंत घुमरे, संचिता पाटील, पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळिंबकर, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, उमेश गायकवाड, वैशाली मोरे, स्वीकृत सदस्य संकेत भासे, हेमंत ठाणगे उपस्थित होते.

भुयारी मार्गाचा लढा…

कर्जत शहर आजपर्यंत दोन भागात विभागले असून कर्जत शहर, मुद्रे, आकुर्ले, दहिवली हा भाग पूर्वेकडे, तर भिसेगाव आणि गुंडगे हा भाग पश्चिम बाजूस आहे. कर्जत नगर परिषद 1992 साली स्थापन झाल्यानंतर या दोन भागात विभागलेल्या शहराला एक अविभाज्य भाग बनविण्यासाठी तत्कालीन सरपंच अनंत जोशी यांनी लढा पुकारला. त्या ठिकाणी वाहनांसाठी फाटक होते आणि ते फाटक बंद करण्याचा घाट मध्य रेल्वेकडून घालण्यात आल्यानंतर अनंत जोशी यांनी भिसेगाव गुंडगे या भागातील जनतेला एकत्र आणले आणि भुयारी मार्गाचा लढा सुरू झाला. त्या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर रेल्वेने उड्डाण पूल बांधल्याने दुसरा उड्डाण पूल होऊ शकत नाही आणि म्हणून भुयारी मार्गाची मागणी होऊ लागली होती. सुरुवातीला हा लढा भिसेगाव फाटक संघर्ष समिती फाटक बंद होऊ नये म्हणून करीत होती, परंतु रेल्वेकडून फाटक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि संघर्ष समितीला मग फाटक बंद होऊ नये म्हणून आंदोलन करावे लागले. यातून सुरू झालेले उपोषण आणि त्यातून झालेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात संघर्ष समितीच्या अनेकांना पोलिसी बळाचा मार खावा लागला. हे सर्व कर्जत शहराने अनुभवले असल्याने आणि कर्जत शहराला कायम भुयारी मार्ग होत नाही याची खंत असायची. त्यातून राज्य सरकारच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने कर्जत येथील भुयारी मार्ग बांधण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले. त्या वेळी सर्वांच्या नजरेसमोर अनंतकाका जोशी यांचे नाव भुयारी मार्गाला द्यावे असे वाटत होते. पण त्यातून निर्माण झालेले सेनेच्या पक्षातील अंतर्गत राजकारण हा या नावाला गालबोट लावण्याचा प्रकार ठरला आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

नमो चषक अंतर्गत कामोठ्यात रस्सीखेच स्पर्धा : नाव नोंदणीची 5 फेब्रुवारी अंतिम तारीख

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply